#TuesdayMotivation : ओडिशातील आदिवासी युवतीची गगनभरारी

पीटीआय
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

अनुप्रिया लाकरा हिने मिळविलेल्या यशाने मला आनंद झाला आहे. निष्ठेने केलेल्या प्रयत्नाचे फळ तिला मिळाले असून, इतरांसाठी तिने आदर्श निर्माण केला आहे. यशस्वी वैमानिकाच्या वाटचालीसाठी अनुप्रियाला शुभेच्छा.
- नवीन पटनाईक, ओडिशाचे मुख्यमंत्री

नक्षलग्रस्त मलकनगिरीतील मुलगी ठरली पहिली व्यावसायिक वैमानिक
भुवनेश्‍वर - ओडिशातील नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या मलकनगिरी जिल्ह्यातील अनुप्रिया लाकरा (वय 23) हिने आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न सत्यात उतरविले आहे. अनुप्रिया ही व्यावसायिक विमान उडविणारी पहिली आदिवासी महिला ठरली आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

अनुप्रिया ही मलकनगिरीचे पोलिस कॉन्स्टेबल मरिनियास लाकरा यांची मुलगी आहे. वैमानिक होण्याचे तिचे स्वप्न होते, ते आता पूर्ण झाले असून, ती लवकरच "इंडिगो एअरलाइन्स' कंपनीत सहवैमानिक म्हणून रुजू होणार आहे. अनुप्रियाने अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडून 2012 मध्ये विमान उड्डाण प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतला होता. सात वर्षांनंतर आती ती विमान उडविण्यास सज्ज झाली आहे.

अनुप्रियाचे वडील व आई जिमाज यास्मीन लाकरा हे मुलीच्या कर्तबगारीवर खूश आहेत. "अनुप्रियाने केवळ आपल्या कुटुंबाचे नव्हे तर संपूर्ण राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे,' अशी भावना या दोघांनी व्यक्त केली. मरिनियास लाकरा म्हणाले की, वैमानिकाच्या प्रशिक्षणाचा खर्च पेलवणे माझ्यासाठी कठीण होते; पण मुलीला ज्यात आवड आहे, तेच शिकवायचे असा निश्‍चय मी केला होता. म्हणून मी कर्ज काढले, नातेवाइकांकडूनही मदत घेतली. अनुप्रियाची आई यास्मीन म्हणाल्या की, मर्यादित मिळकत असूनही आम्ही मुलीला मोठी स्वप्न पाहण्यापासून रोखले नाही. जे बनण्याचे स्वप्न ती पाहत होती, ते तिने पूर्ण केल्याचा आनंद वाटत आहे. माझ्या मुलीने सर्व मुलींसाठी प्रेरणास्रोत बनावे, अशी माझी इच्छा आहे. आपल्या मुलींच्या पंखांना बळ द्या, असे आवाहनही त्यांनी पालकांना केले.

अनुप्रिया लाकरा हिने मिळविलेल्या यशाने मला आनंद झाला आहे. निष्ठेने केलेल्या प्रयत्नाचे फळ तिला मिळाले असून, इतरांसाठी तिने आदर्श निर्माण केला आहे. यशस्वी वैमानिकाच्या वाटचालीसाठी अनुप्रियाला शुभेच्छा.
- नवीन पटनाईक, ओडिशाचे मुख्यमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tribal Girl Anupriya Lakara Pilot Success Motivation