#TuesdayMotivation अभियंत्याने फुलवली ड्रॅगनफ्रुटची शेती

बाळासाहेब लोणे 
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

दुष्काळावर मात करून बाबरगाव (ता. गंगापूर) येथे एका अभियंत्याने ड्रॅगनफ्रुटची शेती फुलवली आहे. विजय सावंत असे या अभियंत्याचे नाव असून, गतवर्षीपासून त्यांनी हा प्रयोग सुरू केला आहे.

गंगापूर - दुष्काळावर मात करून बाबरगाव (ता. गंगापूर) येथे एका अभियंत्याने ड्रॅगनफ्रुटची शेती फुलवली आहे. विजय सावंत असे या अभियंत्याचे नाव असून, गतवर्षीपासून त्यांनी हा प्रयोग सुरू केला आहे. 

काटेरी फळपिकाच्या माध्यमातून यशस्वी शेती करीत श्री. सावंत यांनी दुष्काळात घट्ट पाय रोवले आहेत. ते वाळूज एमआयडीसीतील कॅम्पॅक कंपनीत अभियंता म्हणून काम करतात. वर्ष २००४ मध्ये प्रॉडक्‍शन शाखेत त्यांनी पदविका मिळवली. कंपनीत स्थिरस्थावर झाले. नोकरीला काहीतरी जोडधंदा असावा हा ध्यास घेऊन त्यांनी शेतात काहीतरी करायचे ठरविले; पण दुष्काळात पाण्याअभावी नेमके काय करावे, हे सुचत नव्हते. एका मित्राकडून ड्रॅगनफ्रुटच्या शेतीची माहिती मिळाली. दहा दिवसांतून एका झाडाला फक्त एक लिटर पाणी लागत असल्याचे मित्राने सांगितले. कमी पाण्यावरची ही शेती नोकरी सांभाळून करता येण्याजोगी होती. शिवाय कंपनीला आठवड्यातून दोन दिवस सुटी असल्याने हा वेळ शेतात कारणी लावणे शक्‍य होते. पन्नास हजार रुपये खर्चून त्यांनी शेतात सिमेंटचे खांब उभे केले. या खांबाला वरील भागात रिंग असून, त्यावर एका खांबावर चार झाडे येऊ शकतात. अशी दोनशे झाडे लावली आहेत. ही आगळी-वेगळी शेती बघायला गाव, परिसरातून मोठ्या प्रमाणात लोक येतात. ही शेती दुष्काळात अनेकांना प्रेरणा देत आहे. 

ड्रॅगनफ्रुटसाठी शेतात खांब रोवून, रोपांची लागवड केली. सुटीच्या दिवशी तासभर पाणी दिले की काम भागते. पुढील आठवड्यात फळे यायला सुरवात होईल. सध्या या फळांना दोनशे रुपये किलोचा भाव आहे. 
- विजय सावंत, अभियंता तथा प्रगतिशील शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TuesdayMotivation Dragonfruit farming spread by engineer