जुळ्या बहिणींची आईच झाली गुरू

बालेवाडी - 'खेलो इंडिया'क्रीडा स्पर्धेवेळी (डावीकडून) नेमबाज केतकी, समिता आणि कस्तुरी गोरे.
बालेवाडी - 'खेलो इंडिया'क्रीडा स्पर्धेवेळी (डावीकडून) नेमबाज केतकी, समिता आणि कस्तुरी गोरे.

पिंपरी - आई हीच पाल्यांची पहिली गुरू असते, असे म्हणतात; नव्हे वाकड येथील समिता गोरे यांनी हे सिद्ध करून दाखविले. आपल्या जुळ्या मुली कस्तुरी आणि केतकी यांना नेमबाजी शिकविता यावी, यासाठी त्यांनी स्वतः त्याचे प्रशिक्षण घेतले. आता त्या दोघींच्या ‘गुरू’ होऊन त्यांना प्रशिक्षण देत आहेत. या दोघीदेखील त्यांच्या शिकवणीला खऱ्या उतरत नेमबाजीत विविध प्रकारच्या पदकांचे ‘लक्ष्य’ साधत आहेत.

समिता राजेंद्र गोरे या मूळच्या साताऱ्याच्या. चार वर्षांपूर्वी, सातारा येथे आंतरराष्ट्रीय नेमबाज प्रशिक्षक शिवराज ससे यांच्या उन्हाळी शिबिरात त्यांनी भाग घेतला. तेव्हापासून समिता आणि त्यांच्या दोन्ही मुलींमध्ये नेमबाजीविषयी आवड निर्माण झाली. खेळ पुढे सुरू राहावा, यासाठी गोरे कुटुंबीय वाकड येथे स्थायिक झाले. बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात समिता आता त्या दोघींना नेमबाजीचे प्रशिक्षण देत आहेत.  

याबाबत समिता म्हणाल्या, ‘‘माझ्यासह कस्तुरी आणि केतकी या दोघींनीही १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात नेमबाजीला सुरवात केली. कस्तुरी-केतकी यांनी २०१४ पासून राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्यास सुरवात केली. कस्तुरीने २०१५मध्ये बालेवाडी येथील आंतर शालेय राष्ट्रीय स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात ब्राँझ, तर सांघिक गटात सुवर्णपदक पटकाविले आहे. तर २०१७ मध्ये केतकीने देखील हैदराबाद येथील आंतर शालेय राष्ट्रीय स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात ब्राँझ आणि सांघिक गटात सुवर्णपदक मिळविण्याची कामगिरी केली आहे. याखेरीज, कस्तुरीने डिसेंबर २०१८ मध्ये मध्य प्रदेश येथे झालेल्या ६४ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना ४०० पैकी ३७२ गुण प्राप्त करून संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. आता आम्ही तिघीही १० मीटर बरोबरच २५ मीटर स्पोर्टस्‌ पिस्तूल प्रकार खेळणार आहोत.’’ 

विविध राज्य-राष्ट्रीय स्पर्धांमधून कस्तुरीने आतापर्यंत जवळपास १० सुवर्ण, ८ रौप्य, तर केतकीने ८ सुवर्ण, ८ रौप्य पदके पटकाविली आहेत. तर समिता गोरे यांनी राज्यस्तरीय स्पर्धांमधून सुमारे ३ रौप्य आणि १ ब्राँझपदकाची कमाई केली आहे.

कस्तुरी एकमेव खेळाडू
‘खेलो इंडिया’ स्पर्धेसाठी ‘एसजीएफआय’कडून १७ वर्षांखालील गटात तर नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) तर्फे २१ वर्षांखालील गटात कस्तुरीची निवड झाली होती. या प्रकारे मुलींमध्ये दोन्ही पातळ्यांवरून निवड झालेली ती एकमेव खेळाडू ठरली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com