वन्यप्राण्यांसाठी नैसर्गिक झरे केले जिवंत

सूर्यकांत पवार
शनिवार, 8 एप्रिल 2017

गतसाली नैसर्गिक गुहांच्या तोंडावर व रानात खड्डे काढून त्यात पत्र्याचे डबे पुरून वन्यजिवांसाठी पाण्याची सोय केली होती. या डब्यांमध्ये पाणी ओतणे कठीण होत असल्याने या वर्षी रानातील झरेच वापरात आणण्याचे ठरवून हा निसर्गाचा अनमोल ठेवा जिवंत केला. झऱ्यांमुळे वन्यप्राण्यांबरोबरच गावातील जनावरांचीही सोय झाली आहे. - ज्ञानेश्वर आखाडे, कुसुंबीमुरा 

कास - एप्रिल सुरू झाला की उन्हाची तीव्रता अधिक वाढू लागते. पाण्यासाठी धावाधाव सुरू असल्याचे चित्र गावोगावी दिसते. माणसांची पाण्यासाठी वणवण होत असताना जंगलातील मुक्‍या प्राण्यांनी काय करायचे? त्यांची पाण्यासाठी होणारी धावपळ आपल्याला दिसत नाही. पण, कुसुंबीमुरा येथील कास संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह ग्रामस्थांनी नैसर्गिक झरे जिवंत करत वन्यप्राण्यांची पाण्याची सोय केली आहे. 

ज्ञानेश्वर आखाडे, किसन चिकणे, भरत आखाडे, सुरेश चिकणे, ज्ञानदेव चिकणे आदींनी ग्रामस्थांसह या वन्यजिवांसाठी हा उपक्रम राबवला आहे. कुसुंबीमुरा हे कास पठारालगत वसलेले गाव. गावाच्या परिसरात दाट जंगल असल्याने अनेक वन्यप्राणी या परिसरात राहतात. त्यात ससे, रानडुक्कर, भेकर, सायाळ, खवले मांजर, सांबर, बिबट्या, गवे, वानर, माकड, पिसोरी, अस्वल तसेच सरपटणारे प्राणी, पक्षी, फुलपाखरे आदी वन्यजिवांचा समावेश आहे. कुसुंबीमुराच्या परिसरात कास पठाराच्या कड्यालगत, ओहळांवर अनेक जुने झरे आहेत. पण, दुर्लक्षाने हे झरे निद्रिस्त झालेत. या झऱ्यांच्या तोंडावर दगड, पालापाचोळा, माती बसल्याने झऱ्यांतील प्रवाह आटत चालले आहेत. हे लक्षात घेवून ज्ञानेश्वर आखाडे व सहकाऱ्यांनी हे झरे साफ करण्याचा निर्णय घेतला. टिकाव, फावड्यांचा साह्याने पाण्याच्या तोंडावरील दगड, माती काढली. पालापाचोळा साफ केला. साफसफाईनंतर हे झरे प्रवाहित झाले. पाणी साठवण्यासाठी झऱ्यांभोवती दगड लावून गोल तळी बनवण्यात आली. झऱ्यांचे पाणी साठू लागल्याने वन्यजिवांसाठी हे पाणवठे आधार बनले आहेत. परिसरातील अनेक झरे अशा पद्धतीने प्रवाहित केल्याने हे झरे जिवंत होण्याबरोबरच वन्यप्राण्यांसाठी संजीवनी बनले आहेत.

Web Title: Wild animals water issue