आई घुमडाई देवी

प्रशांत हिंदळेकर
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

जागर नवरात्रोत्सवाचा... 

हिरवे वस्त्र परिधान करून, मांड्या ठोकून बसलेल्या दोन डोंगरामधील घुमडे गावातील श्रीदेवी घुमडाईचे मंदिर प्राचीन मंदिर आहे. श्री आई घुमडाई देवी म्हणजे आदिमाया शक्ती, दुर्गादेवीचे एक रूप होय. सात आसरा, सात बहिणी त्यातील एक म्हणजे घुमडाई देवी होय. आंबडोस गावची विठलादेवी आणि घुमडाई देवी बहिणी होत.

हिरवे वस्त्र परिधान करून, मांड्या ठोकून बसलेल्या दोन डोंगरामधील घुमडे गावातील श्रीदेवी घुमडाईचे मंदिर प्राचीन मंदिर आहे. श्री आई घुमडाई देवी म्हणजे आदिमाया शक्ती, दुर्गादेवीचे एक रूप होय. सात आसरा, सात बहिणी त्यातील एक म्हणजे घुमडाई देवी होय. आंबडोस गावची विठलादेवी आणि घुमडाई देवी बहिणी होत.

नवरात्रोत्सवात देवीची पूजा करून देवीला नऊ माळा लावण्याचा कार्यक्रम सलग नऊ दिवस केला जातो. तालुक्‍यातील एक धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून हे मंदिर नावारूपास येत आहे.

घुमडाई देवी मंदिरात विविध सण साजरे केले जातात. यात चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून रामनवमीपर्यत व त्यानंतर तीन दिवस एकादशीपर्यंत भजनाचा रोज जागर असतो. रामनवमी उत्सव मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवमी ते एकादशी या तीन दिवसांच्या कालावधीत हौशी कलाकार विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी देवीला पोवते रक्षाबंधनाचा विधी केला जातो.

त्यानंतर मंदिरात ढोल वाजवला जातो. त्यानंतरच ग्रामस्थ रक्षाबंधनाचा विधी साजरा करतात. ऋषीपंचमीच्या दिवशी मंदिरात नवे करण्याचा विधी करतात. विधी झाल्यानंतर ढोल वाजतो. त्यानंतर घरोघरी नवे करण्याचा विधी केला जातो. गौरीपूजनच्या दिवशी घुमडाई देवीची पूजा करून गावातील सुहासिनी ओवसा भरण्याचा कार्यक्रम करतात. घटस्थापनेच्या दिवसापासून नऊ दिवस मंदिरात नऊ माळा लावण्याचा कार्यक्रम असतो. विजयादशमीच्या दिवशी नऊ दिवसातील माळा उतरवून देवीची पूजा केली जाते.

मंदिरास पालखी प्रदक्षिणा घातली जाते. शिवलग्न केले जाते त्यानंतर ग्रामस्थ आपट्याची पाने लुटण्याचा विधी करतात. एकादशीला पंढरपूर येथे तुलसीविवाह होतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी रात्री मंदिराच्या तुलसीचा विवाह सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन करतात. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देवीची पूजा केल्यानंतर सर्व मंदिरात दीपप्रज्ज्वलन केले जाते.

मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या एकादशीला श्रीदेवी घुमडाईचा दहीकाला उत्सव असतो. सायंकाळी देवीला सजविण्यात येते. रात्री १२ वाजता देवी घुमडाईची पालखी ढोल-ताशांच्या गजरात मंदिरास प्रदक्षिणा घालते.  श्रीदेवी घुमडाईचे मंदिर हे सुरुवातीस मातीच्या नळ्यांचे होते. १९६० मध्ये या देवळाची पुनर्बांधणी होऊन ते कौलारू करण्यात आले. २००२ मध्ये आलेल्या पुरात हे मंदिर पाण्याखाली गेले. मंदिराचे झालेले नुकसान पाहता गावकऱ्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साकारण्यात आलेले घुमडाई देवीचे मंदिर आकर्षक असेच आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sindhudurg news aai ghumadai devi