प्रत्येक जण दुसऱ्यासाठी व सर्वजण प्रत्येकासाठी - सहकाराचा मंत्र

ॲड. दीपक पटवर्धन, रत्नागिरी
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

अलीकडच्या काळात कै. वसंतदादा पाटील, कै. तात्यासाहेब इनामदार इत्यादी धुरिणांनी सहकाराचा मंत्र उपयुक्त पद्धतीने जपला आणि अत्यंत उपयुक्त, विकासाभिमुख अशी ही सहकार चळवळ नव्या युगातही अधिक गतिमान होणे हे खूप आनंददायी आहे. सहकार चळवळीची सहकारातील उपक्रमांची माहिती सर्वदूर पोहोचावी या चळवळीत अधिकाधिक जनतेने सक्रिय सहभाग घ्यावा या हेतूने राज्य शासनाच्या स्तरावर सहकार सप्ताहाची अंमलबजावणी प्रतिवर्षी १४ ते २० नोव्हेंबर या कालखंडात केली जाते. आजपासून सुरू होणाऱ्या या सप्ताहानिमित्त...

राज्यातल्या सर्व सहकारी संस्थांनी या सप्ताहामध्ये विशेष योगदान द्यावे, सहभाग घ्यावा यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न केले जातात व सहकारातील कार्यकर्ते, नेते आवर्जून या सप्ताहात काही ना काही रचनात्मक कार्यक्रम करण्यामध्ये हिरिरीने भाग घेतात. त्यामुळे सहकारामध्ये नवचेतना जागृत होते.

जागतिकीकरणातही सहकार चळवळीचे महत्त्व कायम आहे. राज्यातील कोट्यवधी जनता या ना त्या सहकारी संस्थेशी निगडीत आहे. सहकाराची ही व्याप्ती हीच सहकाराची खरी ताकद आहे. सहकारामध्ये एकमेकाला साह्य करून सामूहिक ताकदीचा, सकारात्मक आणि रचनात्मक आविष्कार साकार झाला की सहकारातील सहभागी नागरिक, सभासद, तसेच आजूबाजूचा प्रदेश या विकास यंत्रणेमध्ये लाभार्थी होतो. सहकारामध्ये असलेली लवचिकता, सामूहिक नेतृत्वाची पद्धती व सहकारी संस्थेचे असलेले विवक्षित क्षेत्र याचा योग्य पद्धतीने लाभ घेतला तर कोणतेही आव्हानात्मक काम हे लीलया शक्‍य होते.

सहकारामध्ये रोजगारनिर्मितीची मोठी संधी आहे. स्थानिक पातळीवर अशा संधी देणारी ही चळवळ काही अपप्रवृत्तींचा प्रवेश झाल्याने काही वेळा बदनामीच्या व अविश्‍वासाच्या छायेत गेलेली पाहायला मिळते. मात्र अत्यंत मजबूत व निश्‍चित ध्येयधोरणांनी ही चळवळ बद्ध व समृद्ध असल्याने सहकाराचा मंत्र जपणारे ध्येयनिष्ठ कार्यकर्ते या चळवळीला परत अग्रस्थानी आणतात, हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. म्हणजेच ध्येयवादी व व्रतस्थ वृत्ती, प्रामाणिकपणा जपणारा घटक जोपर्यंत समाजात आहे तोपर्यंत सहकार चळवळ फोफावत राहील असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.

कमालीच्या स्पर्धेच्या युगातही सहकार चळवळ अधिक जोमाने वाढत आहे. यावरून सहकाराची उपयुक्तता अधोरेखित होते. शेतीप्रधान असलेल्या प्रदेशाने सहकार चळवळीचा अधिकाधिक अंगीकार करुन सर्व घटकांना या चळवळीमध्ये गुंफून हा देश अधिक बलशाली करणे सर्वांनाच लाभ देणारे ठरेल. सहकार चळवळीमध्ये प्रत्येक जण दुसऱ्यासाठी व सर्वजण प्रत्येकासाठी काम करत असतात. ही संकल्पनाच अत्यंत मौलिक, प्रभावशाली आहे. यातूनच सर्व घटक कार्यान्वित झाले तर ते अत्यंत प्रभावशाली ठरेल, असा संदेश सहकार चळवळ देते. सहकारातील विविध प्रकारच्या संस्थात्मक कामातून ही गोष्ट नेहमीच स्पष्ट होत आली आहे. समाजातील अंतिम घटकापर्यंत पोहोचून अशा घटकाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी सहकाराचे हे माध्यम प्रभावशाली आहे. प्रामुख्याने युवा वर्गाने या चळवळीत सक्रिय होऊन ही विकासाभिमुख चळवळ जोमाने पुढे नेण्यासाठी सहभाग घ्यावा. हा संदेश सहकार सप्ताहाच्या माध्यमातून सर्वदूर पसरणे आवश्‍यक आहे.  
                                                         (शब्दांकन- मकरंद पटवर्धन)

Web Title: Deepak Patvardhan article on Cooperative sector