जमीनीवर बसून भोजन अन् रांगोळीचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी यांची सायंकाळी नाशिकमध्ये सभा होती. त्या वेळी ते दुपारच्या जेवणासाठी आमच्या घरी आले. कार्यकर्त्यांसह जमिनीवर बसून त्यांनी जेवण घेतले. त्या वेळी माझ्या सासूबाईंनी चौरंगावर काढलेल्या रांगोळीचे त्यांनी कौतुक केले. तो संपूर्ण दिवस आमच्यासाठी खूप भाग्याचा व अविस्मरणीय असा होता, अशी आठवण मंगला बंडोपंत जोशी यांनी सांगितली. 

महेश हिरे म्हणाले, की अटलबिहारी वाजपेयी 1983 मध्ये दादासाहेब वडनगरे यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीसाठी आले होते. तेव्हा त्यांना जवळून पाहण्याचा योग आला. त्या वेळी स्वयंसेवक म्हणून माझ्यावर जबाबदारी होती. पाच ते सहा तासांचा त्यांचा सहवास लाभला. प्रत्यक्ष त्यांच्याशी काही संवाद झाला नसला, तरी त्यांची साधी राहणी व व्यक्तिमत्त्वाची आठवण कायमस्वरूपी मनात राहिली. 

शाखेच्या दैनंदिन कामकाजाचा आग्रह 
रमेश गायधनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर कार्यवाह म्हणून काम पाहत असताना 1990 मध्ये श्री. वाजपेयी यांना भेटण्यासाठी खेतवानी लॉन्समध्ये संघपरिवाराचे कार्यकर्ते एकत्र आले होते. त्या वेळची आठवण सांगताना श्री. गायधनी यांनी संघाच्या शाखा किती, तरुणांची संख्या किती, तरुणांसाठी काय कार्यक्रम घेता, अशी माहिती घेत तरुणांसाठी मैदानी खेळ घ्या, देशाच्या हिताच्या एकत्रित चर्चा करा, असे मार्गदर्शन केल्याचे सांगितले. 

ताटातील श्रीखंड प्रसाद 
खेतवानी लॉन्समधील स्नेहभोजनाचे साक्षीदार भाजपचे कार्यालयीन चिटणीस अरुण शेंदुर्णीकर आहेत. त्यांच्यावर श्री. वाजपेयी यांच्या भोजनातील मेन्यूची जबाबदारी होती. भोजन संपल्यावर त्यांच्या ताटातील श्रीखंड प्रसाद म्हणून ग्रहण करण्याची इच्छा प्रकट केल्यावर मधाळ दृष्टिक्षेप टाकत श्री. वाजपेयी यांनी पाठीवर केलेला स्पर्श आजही ऊर्जास्रोत आहे, असे श्री. शेंदुर्णीकर यांनी सांगितले. 

51 कवितांचे पुस्तक भेट 
मुकुंद गजानन बेणी यांनी 16 ऑक्‍टोबर 2000 ला आरोग्यात सुधारणा होण्यासाठीचे पत्र श्री. वाजपेयी यांना पाठविले होते. त्या पत्राला उत्तर म्हणून त्यांच्या 51 कवितांचे पुस्तक मला मिळाल्याचे सांगत श्री. बेणी यांनी काव्यसंग्रहाची प्रत जपून ठेवल्याचे स्पष्ट केले