विठूच्या गजरात मुळगावचे वारकरी दोडामार्गात दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

मुळात संतांनी सर्वधर्म समभावाच्या हेतूने वारीला प्राधान्य दिले. सामाजिक, आर्थिक विषमता नाहीशी करण्यासाठी सर्व जाती-धर्मांच्या लोकांना वारीमध्ये सामावून घ्यायचे आणि भक्तीमार्ग चोखाळायचा, असा शुद्ध हेतू संतांचा होता. तोच हेतू आपण गेली नऊ वर्षे जोपासत आहोत.
- उदय फडके, वारीचे प्रमुख

दोडामार्ग - ‘विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला’चा गजर करीत मुळगाव-गोवा येथील वारकऱ्यांची दिंडी आज दोडामार्गमध्ये दाखल झाली. १३ दिवसांचा पायी प्रवास करून दिंडी पंढरपूरला पोचणार आहे.

मुळगाव-गोवा येथील वारकरी गेली आठ वर्षे पंढरपूरला पायी जातात. पायी वारीचे हे नववे वर्ष आहे. मुसळधार पावसाची तमा न बाळगता अमाप उत्साहाने ते विठ्ठलाच्या ओढीने मार्गक्रमण करतात. त्यांच्या वारीची सुरवात सकाळपासून झाली. जवळपास पंधरा किलोमीटरचा प्रवास करून वारी दुपारी दोडामार्गला पोचली. 

दोडामार्ग तिलारी मार्गावरील श्री सिद्धिविनायक मंदिरात त्यांनी डेरा टाकला आहे. त्यांच्या भोजनाची व्यवस्था मंदिराचे संचालक शरद मणेरीकर यांनी केली आहे. दुपारनंतर ते वायंगणतड येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात मुक्काम करणार आहेत. जवळपास बारा ठिकाणी मुक्काम करून ते पंढरपूरला १ जुलैला पोचतील, तर  ५ जुलैला परत येतील. या तेरा दिवसांत ते साधारणपणे ३४८ किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. त्यांच्या दिंडीत ४२ महिला, तर १०२ पुरुष वारकरी आहेत. सुमारे दीडशे विठ्ठलभक्त विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी  जात आहेत.

महिलांच्या डोक्‍यावर तुळशीवृंदावन, वारकऱ्यांच्या खांद्यावर वीणा आणि हातात भगवी पताका, पुरुष आणि महिला वारकऱ्यांनी विठ्ठलभक्तीने ओथंबलेल्या भजन आणि गजराच्या तालावर धरलेला फेर सारेच नयनरम्य होते.

आषाढी आणि कार्तिकीला पंढरपूरला जाणारी विठ्ठलभक्तांची वारी, त्यांची विठ्ठल भक्ती,  भगवंताप्रती असलेली आस्था  सारेच अचंबित करणारे असते. जात, धर्म, शैक्षणिक, व्यावसायिक, आर्थिक असले बंध या वारीत गळून पडतात आणि दिसतो तो भक्तिमय शुद्ध भाव. म्हणूनच कित्येक वर्षे लोटली तरी पंढरपूर आणि विठोबाप्रमाणेच वारी आणि 
दिंडीची ओढ कमी होऊ शकलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur Wari 2017