गुहागरात शंभरावे गॅसवाहू जहाज दाखल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

गुहागर - तालुक्‍यातील कोकण एलएनजी प्रकल्पामध्ये आज 100 वे गॅसवाहू जहाज दाखल झाले आहे. बीडब्लु पॅरीस असे या जहाजाचे नाव आहे. या जहाजातून पुढील तीन दिवसात सुमारे 1 लाख 50 हजार क्‍युबिक मीटर गॅस एलएनजी प्रकल्पात उतरवून घेतला जाणार आहे. 

गुहागर - तालुक्‍यातील कोकण एलएनजी प्रकल्पामध्ये आज 100 वे गॅसवाहू जहाज दाखल झाले आहे. बीडब्लु पॅरीस असे या जहाजाचे नाव आहे. या जहाजातून पुढील तीन दिवसात सुमारे 1 लाख 50 हजार क्‍युबिक मीटर गॅस एलएनजी प्रकल्पात उतरवून घेतला जाणार आहे. 

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील गॅस ऍथॉरिटी इंडिया लिमिटेड (गेल) या कंपनीचा कोकण एलएनजी हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. अंजनवेल वेलदूरच्या दरम्यान हा प्रकल्प असून या प्रकल्पात 1 लाख 60 हजार क्‍युबिक मीटर गॅस साठविण्याची क्षमता असलेल्या तीन टाक्‍या आहेत. या टाक्‍यांमध्ये वजा 116 डिग्री सेल्सिएस तापमानात हा गॅस साठवला जातो. तेथे द्रवरूपातील नैसर्गिक वायूचे (एलएनजी) रूपांतर सामान्य तापमानातील द्रवरूप नैसर्गिक वायूमध्ये (आरएलएनजी) केले जाते. हा वायू देशभरातील औद्योगिक क्षेत्रात पाइपलाइनद्वारे पाठविला जातो. हा गॅस परदेशातून जहाजाद्वारे आणला जातो.

या गॅसचे तापमान वजा 116 डिग्री सेल्सिएस असल्याने जहाजातून गॅस उतरवून घेणे हे मोठे जिकिरीचे काम असते. 
कोकण एलएनजी प्रकल्पात जानेवारी 2013 मध्ये पहिले गॅसवाहू जहाज आले. परंतु अनेक तांत्रिक कारणांमुळे या जहाजातील गॅस उतरवून घेणे शक्‍य झाले नाही. त्यानंतर जेटीची दुरुस्ती करून ऑक्‍टोबर 2014 मध्ये पुन्हा एकदा गॅसवाहू जहाज कंपनीत आले. त्यामधील गॅस काढून घेण्याचे काम सुमारे 10 दिवस सुरू होते. त्यानंतर कोकण एलएनजी प्रकल्पात दर महिन्याला 3 ते 4 अशा प्रमाणात ऑक्‍टोबर ते एप्रिल या काळात 20 ते 25 गॅसवाहू जहाजे येऊ लागली.

गुरुवारी (ता. 3 ऑक्‍टोबर) कोकण एलएनजी प्रकल्पात 100 वे गॅसवाहू जहाज आले आहे. पुढील 28 ते 32 तासांच्या कालावधीत 250 व्यक्तींच्या सहकार्याने हा गॅस उतरविण्यात येणार आहे. यापूर्वी 28 सप्टेंबरला असेच जहाज आले होते. तर 101 वे जहाज 13 ऑक्‍टोबरच्या दरम्यान येणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 100 th Gas cargo ship enters in Guhagar