Covid Update : रत्नागिरी जिल्ह्यातील 120 जणांनी केली कोरोनावर मात

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

मागील चोवीस तासांत जिल्ह्यात 68 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले.

रत्नागिरी : मागील चोवीस तासांत जिल्ह्यात 68 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा 7 हजार 182 झाला. राज्याच्या तुलनेत जिल्ह्यातील कोरोनामुक्‍त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण पाच टक्‍क्‍यांनी अधिक आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत 120 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण सापडण्याचे जिल्ह्यातील प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे, ही सुखद बाब आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 68 कोरोनाबाधितांपैकी 22 आरटीपीसीआर चाचणीतील तर 46 रुग्ण अँटिजेनमधील आहेत. सर्वाधिक 37 रुग्ण चिपळूण तालुक्‍यात सापडले. मंडणगड तालुक्‍यात एकही नवीन रुग्ण नाही. उर्वरित तालुक्‍यांत दापोली- 1, खेड- 2, गुहागर- 2, संगमेश्‍वर- 5, रत्नागिरी- 10, लांजा- 4, राजापुरात 7 रुग्ण सापडले. 

हेही वाचा - कोकणात कमी होत चाललेली पिके लागलीत बहरायला 

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेतून कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रत्यक्ष घरापर्यंत पोचली आहे. मागील चोवीस तासांत जिल्ह्यात 120 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 6,016 रुग्ण बरे झाले आहेत. हे प्रमाण 83.76 टक्‍के आहे. 

रविवारी  (27) एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, मात्र 3 सप्टेंबरपासून नोंद करण्याची राहून गेलेल्या पाच मृतांची आजच्या आकडेवारीत भर पडली आहे. त्यात 26 तारखेला मृत्यू झालेल्या एका रुग्णाचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक चार रुग्ण खासगी रुग्णालयात मृत्यू पावलेले आहेत. जिल्ह्यातील मृतांचा आकडा अडीचशेवर पोचला असून, मृत्युदर 2.40 टक्‍के आहे. मृतांमध्ये खेड, संगमेश्‍वर, चिपळूण तालुक्‍यातील रुग्णांचा समावेश आहे. रत्नागिरी तालुक्‍यातील मृतांचा आकडा 72 वर पोचला आहे, तर चिपळुणात 61 आणि खेडात 42 रुग्ण मृत्यू पावले आहेत. 

हेही वाचा -  शेतकऱ्यांनो तुम्हाला आता गावातच मिळणार शेतीविषयक योजनांची माहिती 

* आजचे बाधित - 68 
* आतापर्यंतचे एकूण बाधित - 7,182 
* एकूण निगेटिव्ह - 35,190 
* आजचे बरे झालेले - 120 
* एकूण बरे झालेले - 6,016 
* एकूण मृत - 250 
* उपचाराखालील रुग्ण - 790 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 120 corona patients discharged today but 68 people reports are positive in ratnagiri