कष्टाच्या सोसल्या झळा; फुलला सेंद्रिय मळा

दोन एकरांत भाजीसह घेतली विविध १३ पिके; संतोष राघव यांचे कष्टसाध्य यश
13 different crops grown with vegetables 2 acres Santosh Raghav rajapur
13 different crops grown with vegetables 2 acres Santosh Raghav rajapursakal

राजापूर : जादा उत्पादन आणि उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्‍यांकडून रासायनिक खतांची जादा मात्रा वा पिकांवर विविध औषधांची फवारणी केली जाते. मात्र, या रासायनिक खतांचा वापर आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरतो. त्यामुळे रासायनिक खताला फाटा देत तालुक्यातील गोठणे दोनिवडे येथील संतोष राघव या तरुणाने आरोग्याला पोषक ठरणारा सेंद्रिय शेतीचा मळा फुलवला आहे. सुमारे दोन एकर क्षेत्रामध्ये भाजीसह विविध प्रकारची १३ पिके घेतली. त्याने शेतीक्षेत्रातील उत्पादनाचे नवनवीन प्रयोगही केले आहेत. ''सेंद्रिय भाजीची चवच न्यारी'', अशा शब्दामध्ये संतोषच्या भाजीसह शेतमालाचे ग्राहक कौतुक करतात.

अर्जुना नदीच्या काठावरील उन्हाळ्यामध्ये पडीक असलेली शेतजमीन भाडेकरारावर घेऊन राघव यांनी त्या ठिकाणी सेंद्रिय शेतीचा मळा फुलवला आहे. गेल्या पाच वर्षापासून या मळ्यामध्ये भाजीपाल्यासह वाली, मका, बटाटा, कांदा, भेंडी, कलिंगड, टॉमेटा, वांगी, कारले, काकडी, चवळी, मिरची, झेंडू आदी विविध पिके घेत आहेत. त्याचवेळी त्यांनी काळा तांदूळ, बटाटा आणि कांदा लागवडीचाही प्रयोग केला आहे. त्यासाठी त्यांना पत्नी, भाऊ यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. पिकणाऱ्‍या शेतमालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्धतेची फारशी समस्या भेडसावली नाही. सुमारे सहा-सात कि.मी. अंतर कापून राजापूर शहरातील ग्राहकवर्ग थेट शेताच्या बांधावर येऊन भाजीपाला आणि अन्य शेतमाल खरेदी करत असल्याचे ते सांगतात.

गोठणेदोनिवडे गावासह पंचक्रोशीतील ग्रामस्थही या ठिकाणी खरेदीसाठी येतात. त्या व्यतिरिक्त गावा-गावांमध्ये साजरे केलेले जाणारे विविध उत्सव, सण, कार्यक्रम, लग्नसमारंभ आदींनीही भाजीपाल्याची आवश्यकता भासत असल्याने यजमान थेट शेतामध्ये येऊन त्याची खरेदी करतात. शेतीच्या माध्यमातून अर्थार्जनाचा नवा शाश्‍वत स्त्रोत निर्माण करीत रिक्षा व्यावसायिक असलेल्या संतोष यांनी साऱ्‍यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

एक नजर..

  • वाली, मका, बटाटा, कांदा, भेंडी आदी पिके

  • काळा तांदूळ, बटाटा लागवडीचा प्रयोग

  • स्थानिक पातळीवर बाजारपेठेत विक्री

  • गेली पाच वर्षे शेतीमध्ये नवीन प्रयोग

  • भाडेकरारावर जागा घेऊन शेती

  • कमी मनुष्यबळ, पाणी वितरणाचे नियोजन

शेणखताचा जास्त वापर

रासायनिक खतांचा वापर करत शेती करण्याऐवजी संतोष राघव यांनी सेंद्रिय शेती करण्यावर भर दिला आहे. त्यामध्ये जमिनीची मशागत करताना शेणखताचा जास्त वापर करीत असल्याचे संतोष यांनी सांगितले. पक्ष्यांना परावर्तित करणे यांसह कामांसाठी उपलब्ध न होणारे मनुष्यबळ आणि पाणी वितरण याचे त्यांनी सुयोग्य नियोजन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com