esakal | अबब! दीडशे किलोचा ‘वाघळी’मासा सापडला जाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

अबब! दीडशे किलोचा ‘वाघळी’ मासा सापडला जाळ्यात

अबब! दीडशे किलोचा ‘वाघळी’ मासा सापडला जाळ्यात

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी : शहराजवळील काळबादेवी (ratnagiri kalabadevi) येथील एका मच्छीमाराला (fisherman found 150 kg vaghali fish) सुमारे दीडशे किलोचा वाघळी मासा सापडला. विक्रीसाठी नेणाऱ्या छोट्या टेम्पोचा पूर्ण हौदा त्या माशाने व्यापला होता. आत्तापर्यंत सापडलेला हा सर्वात मोठा मासा आहे. कोरोनामुळे (effects on covid-19 in salling) या माशाला दर मात्र कमी मिळाला. हा मासा ६ फूट रुंद आणि ७ फुटापेक्षा अधिक लांब होता.

तौक्ते चक्रीवादळ (tauktae cyclone) सरून गेलं आणि मासळी समुद्रातून गायब झाली. छोटे मच्छीमार किनाऱ्यापासून काही अंतरावर मिळेल ते मासे पदरात पाडून घेत घरी परत येत आहेत. काळबादेवी येथील मच्छीमार संदेश मयेकर यांचे नशीब आज जोरावर होते. सकाळी मिऱ्यापासून काही अंतरावर तांडेल निकेत मयेकर यांच्यासह त्यांची नौका मासेमारी करत होती. फारसा मासा मिळत नव्हता. ते माघारी फिरले. परत येताना जाळे टाकले आणि अचानक जाळ्यात मासे लागल्याचे त्यांना जाणवले. जाळं जड लागल्यामुळे कुतूहल वाढले. जाळे पाण्याबाहेर काढण्यास सुरवात केली आणि नौकेतील मच्छीमारांचे चेहरे फुलून गेले.

हेही वाचा: पैशापेक्षा माणसं, फॅमिली जपूया! 24 तासांत आम्ही आई-वडिल गमावलेत

मासळीची कमतरता असताना वाघळी माशाची लॉटरी लागली होती. त्यांनी भराभर मासा पाण्याबाहेर काढला आणि ते किनाऱ्याकडे आले. हाती लागलेला मासा बघून तेही अचंबित झाले होते. एवढा मोठा मासा विक्रीला नेण्यासाठी टेम्पो मागवला. आकाराने मोठी असलेली वाघळी गाडीच्या हौदात नेली तेव्हा छोट्या टेम्पोतील पूर्ण जागा माशाने भरून गेली.

मिऱ्या येथील काही लोकांनी तो मासा विकत घेतला. सध्या कोरोनामुळे दर कमी असल्यामुळे त्याला थोडी कमी किंमत मिळाल्याची चर्चा होती; मात्र एवढा मोठा मासा प्रथमच रत्नागिरीच्या किनारी सापडल्याचे मच्छीमारांनी सांगितले. या माशाला बाजारात चांगली मागणी असून किलोला १७० रुपये दर मिळतो. आठवड्यापूर्वी तौक्ते चक्रीवादळामुळे समुद्र खवळला होता. त्यामुळे हा मासा किनाऱ्यावर आला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

"एवढा मोठा वाघळी मासा प्रथमच मिळाला आहे. सकाळपासून मासेमारी करत होतो. दुपारी माघारी येताना जाळीत मासा सापडला. कोरोनामुळं माशाला दर मात्र कमी मिळाला."

- निकेत शिवलकर, तांडेल

हेही वाचा: Corona Updates: मृतांची संख्या पुन्हा वाढली