esakal | कर्करोग, हृदयरोगासाठी मिळणार आता १५ हजार रुपये

बोलून बातमी शोधा

15000 rupees financed to economically weak people from zilha parishad in ratnagiri}

जिल्हा परिषद सेस निधीतून आर्थिक मदतीसाठी लाभार्थीला अर्ज सादर करावा लागेल. 

कर्करोग, हृदयरोगासाठी मिळणार आता १५ हजार रुपये
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंडसंबंधित दुर्धर आजार झालेल्या व्यक्तींना जिल्हा परिषद मदतीचा हात देणार आहे. जिल्हा परिषद सेस फंडातील निधीतून दुर्धर आजारासाठी प्रत्येकी १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाईल. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत. संबंधित रुग्णाची आवश्‍यकता लक्षात घेऊन ही मदत दिली जाईल.

हेही वाचा - विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी शिक्षकांची डोंगर कड्यातून पायपीट 

जिल्हा परिषदेच्या ४ ऑगस्टला झालेल्या सभेत याबाबतचा निर्णय झाला होता. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना याबाबतचे प्रस्ताव मागविण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात या योजनेची आरोग्य उपकेंद्र, ग्रामपंचायत स्तरावर जागृती केली जात आहे. कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड रुग्णांशी प्रत्यक्ष संपर्क साधला जात आहे. जिल्हा परिषद सेस निधीतून आर्थिक मदतीसाठी लाभार्थीला अर्ज सादर करावा लागेल. या मदतीसाठी ग्रामीण भागातील रहिवासी पुरावा, रुग्ण हा भूमिहीन, अल्पभूधारक, दारिद्य्ररेषेखालील अथवा स्वातंत्र्यसैनिक असल्याचा दाखला असल्यास प्राधान्य दिले जाते; मात्र सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे यातील कोणत्याही दाखल्याची आवश्‍यकता नाही.

रुग्ण दुर्धर रोगाने पीडित असल्याबाबतचे प्राधिकृत वैद्यकीय संस्थेच्या तज्ञ डॉक्‍टरांचे अथवा जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र असणे आवश्‍यक आहे. मूळ कागदपत्रे, प्रयोगशाळा तपासणी अहवाल व संबंधित मूळ वैद्यकीय देयके यांची प्रत्यक्ष खात्री करून वैद्यकीय अधिकारी यांनी संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत स्वयंस्पष्ट शिफारशीसह प्रस्ताव जिल्हा परिषदकडे सादर करावा लागेल. त्यानंतर संबंधित रुग्णाच्या राष्ट्रीयकृत बॅंक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाईल. सध्या बाधितांचा शोधासाठी प्रत्येक तालुक्‍यातील ग्रामपंचायत स्तरावर सर्व्हेक्षण झाले आहे. त्यामध्ये दुर्धर आजाराच्या रुग्णांचीही माहिती घेतली आहे. यात शेकडो रुग्ण आढळले. 

हेही वाचा - खाड्यांमध्ये साठतोय अशा पद्धतीने गाळ 

"तालुक्‍यातील अनेकांना दुर्धर आजाराने ग्रासले असले तरी त्या व्यक्तीची गरज व आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेऊन मदत केली जाईल. ज्यांना नितांत मदतीची आवश्‍यकता आहे अशांनीच ग्रामपंचायत किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून प्रस्ताव सादर करावेत."

- डॉ. ज्योती यादव, तालुका आरोग्याधिकारी

संपादन - स्नेहल कदम