पडिक जमिनीचा विकास हाच संकल्प

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

कणकवली- सावंत पटेल आणि सिंधुदुर्ग शेतकरी उत्पादक कंपनीने कोकणातील पडिक जमिनीच्या विकासातून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधण्याचा संकल्प केला आहे. विषमुक्त शेती हीच आरोग्याचे रक्षण करणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळावा म्हणून झिरो बजेट नैसर्गिक शेती प्रशिक्षण हे कंपनीचे उद्दिष्ट असल्याचे मत बी. डी. सावंत यांनी व्यक्त केले.

शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे 26 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक झिरो बजेट आधारित शेती प्रशिक्षण शिबिर होणार आहे. या अनुषंगाने कंपनीचे मुख्य प्रवर्तक बी. डी. सावंत यांनी ही माहिती दिली. या वेळी शशी सावंत, कृषी तज्ज्ञ सुनील सावंत, प्रसाद सावंत, प्रमोद सावंत, एस. टी. सावंत, मोहन सावंत, विजय सावंत, हिरबा सावंत, डी. एम. सावंत, प्रसाद राणे, सुनील देसाई उपस्थित होते.

कोकणातील पडिक जमिनीचा विकास करीत असताना सिंधुदुर्ग शेती उत्पादक कंपनी ही इच्छुक शेतकऱ्याला भागीदार बनविणार आहे. शेती आणि शेतीपूरक व्यवसायातून मिळणारे उत्पादन खरेदी करून त्यातून मिळणारा नफा शेतकऱ्यांनाच दिला जाईल. परंतु ही शेती नैसर्गिक शेती असावी. जेणेकरून भावी पिढीला विषमुक्त धान्य मिळावे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे श्री. पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना पाच दिवसांचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणात जमिनीचे व्यवस्थापन, नैसर्गिक खत निर्मिती, देशी गाईचे संवर्धन, गोमुत्राचा कीटकनाशक म्हणून वापर अशा विविध विषयांवर मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक होणार आहे. एका देशी गाईपासून 30 एकरची शेती नैसर्गिकदृष्ट्या कशी विकसित केली जाते याचे मार्गदर्शनही केले जाईल. या शिबिरासाठी आतापर्यंत आठशे शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून राज्याच्या विविध भागांतील शेतकरी या प्रशिक्षणासाठी येणार आहेत. परंतु कोकणातील शेतकऱ्यांनी यात सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे नोंदणी करून यात सहभाग घेण्याचे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे.