मुरूड किनाऱ्यावर आगीत 17 स्टॉल भस्मसात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

सात सिलिंडरचा स्फोट, 18 लाखांचे नुकसान

सात सिलिंडरचा स्फोट, 18 लाखांचे नुकसान
हर्णे - दापोली तालुक्‍यातील मुरूड समुद्रकिनारी तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या 18 स्टॉलना अचानक आग लागली. यांत स्टॉलमधील सात सिलिंडरचा एकापाठोपाठ स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. यामध्ये सुमारे 18 लाखांचे नुकसान झाले आहे. स्थानिकांसह खेडच्या अग्निशामक बंबाने सुमारे पाच तासांनंतर आग आटोक्‍यात आणली.

मुरूड हे पर्यटकांच्या दृष्टीने लोकप्रिय ठिकाण असल्यामुळे येथे पर्यटकांच्या सोयीसाठी अनेक रिसॉर्ट आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी तात्पुरत्या स्वरूपात खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉलही किनाऱ्यावर उभारले आहेत. दुसरा शनिवार, रविवार सुटीचा असल्याने अनेकांनी मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ विक्रीसाठी दुकानात आणून ठेवले होते. 12 मे रोजी स्टॉल व्यावसायिक रात्री दहाच्या सुमारास व्यवसाय बंद करून घरी गेले. त्यानंतर मध्यरात्री दीडच्या सुमारास या स्टॉलना आग लागली. हे स्टॉल आच्छादनासाठी प्लॅस्टिक व तत्सम पदार्थाचा वापर केला होता. त्यामुळे एकमेकाशेजारी असलेले 18 स्टॉलही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यातच सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. ग्रामस्थांनी तातडीने धाव घेऊन आग विझविण्यास सुरवात केली; मात्र एकापाठोपाठ सिलिंडर असल्याने बचावकार्यात अडचणी येत होत्या. दापोलीत अग्निशमन यंत्रणा नसल्याने खेडहून बंब मागवावा लागला. त्यानंतर सकाळी सहा वाजता आग आटोक्‍यात आली.

Web Title: 17 stall fire on murud beach