esakal | अधिकाऱ्यांचे ‘सरप्राईज’ या २२ जणांना पडले महागात...

बोलून बातमी शोधा

22 worker punishment on zilla parishad offices sindhudurg kokan marathi news

२२ ‘लेटलतिफां’वर बडगा सीईओंकडून अचानक भेट; तपासणीने कर्मचाऱ्यांची धांदल...

अधिकाऱ्यांचे ‘सरप्राईज’ या २२ जणांना पडले महागात...
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ओरोस (सिंधुदुर्ग) : मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी आज सकाळी पावणेदहाला जिल्हा परिषदेतील कार्यालयांना अचानक भेट दिली. त्यांच्या ‘सरप्राईज’ भेटीमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली. उशिरा कार्यालयात पोचणाऱ्यांची यामुळे पंचाईत झाली. डॉ. वसेकर यांनी हजेरी मस्टरची तपासणी केली. या वेळी तब्बल २२ कर्मचारी वेळेत आले नसल्याचे स्पष्ट झाले. त्या सर्वांना त्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे पाच फेब्रुवारीला घेतल्यानंतर डॉ. वसेकर यांनी तुंबुन राहिलेल्या फाईली निकाली काढण्याच्या धडाका लावला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वीय सहायकाच्या केबिनमध्ये ढिगाने पडलेल्या फाईली यामुळे दिसेनाशा झाल्या आहेत. राज्य विकास सेवेत २१ वर्षे काम केल्याने त्यांना प्रशासकीय कारभाराची चांगलीच जाण आहे. त्याचा फायदा त्यांना काही प्रमाणात निर्णयाअभावी स्थिरावलेला कारभार गतिमान होताना दिसत आहे.

हेही वाचा- त्याला काजू बी काढल्याचा आला राग म्हणून मारले आजीला....

‘सरप्राईज’ भेटीमुळे धांदल
सहा महिन्यांपूर्वी ज्या कामांचा निपटारा होणे अपेक्षित होते, ती कामे त्यांनी आता मार्गाला लावल्याचे बोलले जाते. त्यांच्या वेगवान कारभारामुळे सुस्थावलेल्या काही अधिकारी-कर्मचारी यांना चांगलाच झटका बसला आहे. काही खातेप्रमुख केवळ नियमावर बोट ठेवत जिल्हा परिषदेचा कारभार संथ करीत होते. डॉ. वसेकर यांच्या प्रशासकीय अभ्यासामुळे त्यांचीही चांगलीच पंचाईत झाली आहे. आता त्यांना कारणे सांगून पळवाट काढणे कठीण झाले आहे.

हेही वाचा- रत्नागिरीत ‘त्या’ जहाजामुळे समुद्रात होतेय जलप्रदूषण....

प्रशासकीय कारभार गतीमान करण्यासाठी प्रलंबित कामांची पूर्तता करण्यास प्राधान्य देणाऱ्या डॉ. वसेकर यांनी आज जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांना ‘सरप्राईज’ भेटी दिल्या. शासनाने २९ फेब्रुवारीपासून क्षेत्रीय अधिकारी-कर्मचारी वगळता सर्वांना पाच दिवसांचा आठवडा केला आहे. त्यामुळे या पाच दिवसात कार्यालयीन वेळ वाढविली आहे. सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी वेळ केली आहे. त्यामुळे वेळेचे बंधन पाळले जाते की नाही, हे पाहण्यासाठी त्यांनी ही भेट दिली. त्यांनी हजेरी, पेंडिंग कामांची माहितीही घेतली. लेटमार्क, दांडीबहाद्दर, कामचुकारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 

दिवसभर आढावा
डॉ. वसेकर यांनी पदभार घेतल्यावर प्रथमच आज खातेप्रमुखांचा आढावा घेतला. सकाळी सुरू झालेली आढावा बैठक दुपारी जेवणाची वेळ वगळता दिवसभर चालली. सायंकाळी उशिरापर्यंत बैठक सुरू होती.