बोअरवेलना २५ फुटांवर पाणी

प्रकाश पाटील
बुधवार, 12 एप्रिल 2017

‘सह्याद्री’चे साखळी बंधारे - जलसंधारणमधून कामे - शरद पवार व मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

‘सह्याद्री’चे साखळी बंधारे - जलसंधारणमधून कामे - शरद पवार व मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

सावर्डे - कोकणात पाणीटंचाईची भीषणता लक्षात घेतली, तर भविष्यात जलसंवर्धन आणि जलस्रोत राखण्याशिवाय पर्याय नाही. याचे भान ठेवून सह्याद्रीचे कार्याध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी जलस्रोत राखण्यासाठी साखळी बंधारे बांधले आहेत. या बंधाऱ्यांमुळे पाणी जमिनीत मुरले आहे. परिणामी परिसरातील बोअरवेलला केवळ २० ते २५ फुटांवर पाणी मिळू लागले आहे. त्यांच्या या कामगिरीचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी कौतुक केले. पाण्याचे संवर्धन करण्यासाठी अनेक कल्पना राबवायला हव्यात, नद्यांचे पुनरुज्जीवन व पाण्याचे स्रोत तसेच भूजल पातळी राखणे काळाची गरज आहे. गेल्या वर्षी कापशी नदीचा गाळ उपसून कापशी नदीचे पुनरुज्जीवन करण्यात निकम यांनी पुढाकार घेतला होता. याच्या जोडीला खरवते (ता. चिपळूण) येथे सह्याद्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सहा साखळी बंधारे पूर्ण केले आहेत. स्वखर्चाने निकम यांनी बंधारे बांधण्याचा केलेला प्रयोग हा प्रेरणादायी आहे. संपूर्ण कोकणासमोर जलसंवर्धनाचे खरवते येथील साखळी बंधारे आदर्श मॉडेल ठरत आहेत. कोकणातील पाणीटंचाई वर मात करण्यासाठी निकम यांनी केलेल्या कामाची साखळी बंधाऱ्याविषयी खुद्द शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना फोनवरून माहिती दिली. त्यामुळे निकम यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनीही त्यांचे कौतुक केले.

‘‘जलसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे. कोकणात पर्जन्यमान चांगले असूनही जलसंवर्धन करण्यात कोकण कमी पडत आहे. त्यासाठी छोटे-छोटे बंधारे बांधल्यास जलसंवर्धन करता येईल. शेती आणि फळबागेसाठी मुबलक पाणी मिळू शकते. शेखर निकम यांचा आदर्श सर्वांनी घेतल्यास ठिकठिकाणी पाणी साठवले जाईल. त्यामुळे भूजलपातळी सुधारेल.’’
- शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री

Web Title: 25 feet water boarwell