'अभिनयाचे अध्यात्म म्हणजेच नाटक'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

सावरकर झाले भावनावश..
संमेलनाध्यक्ष कसे झालो हे आपल्यालाच माहिती नाही. कोणीतरी बोलले ते नाट्य परिषदेने उचलून धरले. उमेदवारीचा अर्ज भरायला सांगितले. फारच आग्रह झाला तेव्हा दुसऱ्या कोणीही अर्ज भरला तर मी उमेदवारी मागे घेईन असे वचन घेतले. पण उत्सुक असलेल्या अनेकांनी माझे नाव ऐकून उमेदवारी अर्जच भरले नाहीत. कल्पना नसताना मी संमेलनाध्यक्ष बनलो. उतारवयात चतुरंगने सहस्त्र चंद्रदर्शनाचा दिमाखदार कार्यक्रम केला. मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार मिळाला. ८० व्या वर्षी पाहायला मिळाले. स्तुतीसुमने आणि कौतुकाच्या शालींचे ओझे आता सहन होत नाही, असे सांगताना सावरकर भावनावश झाले.

गुहागर - आवड म्हणून नाट्यक्षेत्रात काम करू लागलो. टीकेला सकारात्मक दृष्टीने पाहिल्याने घडलो. किती पैसे मिळतील, पुरस्कार मिळतील याचा कधीच विचार न करता अभिनयाचे अध्यात्म म्हणजे नाटक असे मानून सेवा केली. त्याची पोचपावती नाट्यरसिकांनी दिली, अशा शब्दात आपल्या रंगभूमीवरील कारकिर्दीचे मर्म अभिनेते जयंत सावरकर यांनी उलगडले. अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांचा सत्कार व जाहीर मुलाखत येथे झाली. त्यावेळी त्यांनी अनुभवाचा खजिना उघड केला. 

सावरकर म्हणाले की, ‘‘गुहागरात ६ व्या वर्षापासून नाटक पाहात होतो. तेथूनच नाट्यक्षेत्राचे वेड निर्माण झाले. गिरगावच्या चाळीत गणेशोत्सवात नाटकात काम करू लागलो. तेथील मराठी साहित्य संघात नाट्यसंस्कार मिळाले. त्याकाळी शॉर्टहॅण्ड येणाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे नोकरी सहज मिळायची. त्यामुळे नाटकात बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणून काम करताना अनेक नोकऱ्या सोडल्या. व्यावसायिक रंगभूमीवर विदूषक नाटकापासून आलो. हे काम इतके सुंदर झाले की प्रेस जर्नालिस्ट असोसिएशनचा पहिला पुरस्कार मिळाला. त्यामुळे नोकरी न करता नाटकातून चरितार्थ चालवायचे नक्की केले. पण अडीच वर्ष नाटक मिळालं नाही. गुहागरातून कुळिथाचे पीठ, मेतकुट, पापड मुंबईत नेऊन विकत होतो. सासरे मामा पेंडसे यांनी गरिबीला कंटाळून पुन्हा नोकरी करू नका, असा सल्ला दिला. पत्नीने साथ दिली. रोखीने जेवढे घेता येईल तेवढेच घ्यायचे, उधारी करायची नाही, गरजा वाढवायच्या नाहीत हे तंत्र अवलंबिले.’’

ते म्हणाले, ‘‘पत्नीची फाटलेली साडी बघून मावळंकर आणि कंपनी या दुकानमालकांनी बोलावून घेतले. जेव्हा मिळतील तेव्हा पैसे द्या असे सांगून साड्या दिल्या. तेव्हापासून कृतज्ञता म्हणून मावळंकर आणि कंपनीतच खरेदी करू लागलो. मुली नाराज व्हायच्या. त्यांना ही गोष्ट सांगितली. १९७८ साली सूर्यास्त हे नाटक मिळाले. १२०० रुपयांची नोकरी सोडलेल्या जयंताला महिन्याकाठी दहा-बारा प्रयोगांचे ४०० रुपये मानधन मिळू लागले.  व्यक्ती आणि वल्लीमधील अंतू बर्वाने मी नाट्यसृष्टीतील आवश्‍यक नट बनलो. याच नाटकाने अमेरिका दाखविली.’’
ते पुढे म्हणाले,‘‘पूर्वी प्रत्येक कला

काराला पूर्ण नाटक पाठ असलेच पाहिजे असा दंडक होता. त्यामुळे एखादा नट आला नाही तरी दौरा थांबत नसे. बेबंदशाहीमध्ये एका दौऱ्यात एकाच प्रयोगात पाच भूमिका केल्या. ‘सुंदर मी होणार‘ या नाटकाचा अमेरिकेला प्रयोग होता. यातील मुख्य भूमिका करणारे डॉ. लागू प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नाहीत. न्यू जर्सी येथील प्रयोगात त्यांची भूमिका मला करावी लागली. रंगमंचावरील प्रवेशावेळी मलाच डॉ. लागू समजून प्रेक्षकांनी टाळ्या वाजविल्या आणि एक्‍झिटच्या वेळी जयंत सावरकरला प्रेक्षकांनी डोक्‍यावर घेतले. निर्मात्याने ५० डॉलरचे बक्षीस तत्क्षणी दिले.’’

संहिता हाच आचार असल्याने आचारसंहितेची गरजच कधी लागली नाही. आज पगाराबरोबर होणारी मुलींची लग्ने पाहून दु:ख होते. आमचा संसार भावनेच्या, प्रेमाच्या बळावर मोठा झाला. जन्म देतो तोच अन्न पुरवितो हा आमच्या संसाराचा मंत्र होता. निर्धाराने तोंड देत, कलेशी तडजोड न करता यशाची वाट पाहत राहिलो. अशी जीवनमूल्ये मुलाखतीदरम्यान सावरकरांनी सांगितली.