कोल्हापुरातून रत्नागिरीत गेलेल्या सलाईनच्या 28 बॉक्सची चौकशी होणार

राजेश कळंबटे
Monday, 12 October 2020

कोल्हापूर येथून आलेल्या औषधाचा साठा रत्नागिरीत जप्त करण्यात आला होता.

रत्नागिरी : कोल्हापूर येथून आलेले ते सलाईनचे 28 बॉक्स कुणी मागवले याची चौकशी करण्यासाठी प्रांताधिकारी विकास सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. कोल्हापूर येथून आलेल्या औषधाचा साठा रत्नागिरीत जप्त करण्यात आला होता. तो कुणी पाठवला याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहे. 

हेही वाचा -  मुख्यमंत्र्यांच्या मुलांच्या हट्टापायी आरे कारशेडची जागा बदलली

खासगी कुरिअर सेवेतून आलेले ते बॉक्स जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या नावे होता. या प्रकाराची कसुन चौकशी व्हावी असे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले होते. औषधाचा साठ्याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांना माहिती मिळाली होती. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिश्रा यांनी प्रांताधिताकारी डॉ. सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. त्यात सदस्य म्हणून जिल्हा परिषद  जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त, लेखाधिकारी (जिल्हाधिकारी कर्यालय प्रशासन विभाग) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

हेही वाचा - Good News : लवकरच ग्रंथालये होणार सुरू 

खासगी कुरिअरद्वारे ज्यांच्या नावे तो बॉक्स आला होता ते जिल्हा रुग्णालयातील आहेत. त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे. परंतु त्यांनी तो साठा मागवलेला नाही असे कळविल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले. 
संबधित साठा घेवून येणार्‍या वाहतूकदारांची चौकशी समितीच्या माध्यमातून केली जाणार आहे. जिल्हाधिकारी यांच्याबरोबर समितीची बैठक झाली की त्यातून खरे पुढे येईल अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 28 box of medicine from kolhapur to ratnagiri check said uday samnat on that topic in ratnagiri