कणकवलीत तापसरीचे ३० ते ४० रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

कणकवली - वातावरणातील बदलामुळे तालुक्‍यात तापसरीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात दिवसाला ३० ते ४० तापसरीचे रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने असलेल्या डॉक्‍टरांवर ताण येत आहे.

कणकवली - वातावरणातील बदलामुळे तालुक्‍यात तापसरीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात दिवसाला ३० ते ४० तापसरीचे रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने असलेल्या डॉक्‍टरांवर ताण येत आहे. तसेच तज्ज्ञ डॉक्‍टर्स नसल्याने अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. दरम्यान आज पंचायत समिती सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली.

मागील काही दिवसांत पावसाने घेतलेली विश्रांती, वाढते ऊन आणि पहाटेच्या सत्रात असणारा गारवा या बदलत्या वातावरणामुळे तापसरीच्या रुग्णांत वाढ होत आहे. सद्यःस्थितीत कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कणकवली, देवगड तसेच कुडाळ तालुक्‍यांतील अनेक गावांतील रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत; मात्र तज्ज्ञ डॉक्‍टर्स नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालय गाठावे लागत आहे.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १३ डॉक्‍टरांची आवश्‍यकता आहे. येथे सध्या ७ डॉक्‍टर्स कार्यरत आहेत. यातील रात्रपाळीसाठी दोन व अंतर्गत रूग्ण तपासणीसाठी २ डॉक्‍टर्स आहेत. तर उर्वरित तीन डॉक्‍टरांना दिवसभरात येणाऱ्या दीडशे ते दोनशे रुग्णांची तपासणी करावी लागत आहे. या रुग्णांपैकी ३० ते ४० रुग्ण तापसरीचे आढळून येत आहेत. यातील जास्त आजारी रुग्णांना दाखल करून घेतले जातेय तर उर्वरितांना प्रथमोपचार करून घरी पाठविले जात आहे.

उपजिल्हा रुग्णालयात तापसरीच्या रुग्णांची संख्या वाढती असल्याने साटम यांच्यासह उपसभापती दिलीप तळेकर, जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा विखाळे, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, गणेश तांबे, सुचिता दळवी, विस्तार अधिकारी 
पावसकर आदींनी आज उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली.

मागील दहा दिवसांत कणकवली तालुक्‍यात डेंग्यूचे दहा रुग्ण आढळले. तर तापसरीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे डॉक्‍टरांना दक्ष राहण्याच्या सूचना आम्ही आज दिल्या. तसेच तापसरीच्या सर्व रुग्णांसाठी पुरेसा औषधसाठा ठेवा असेही निर्देश उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना दिले 
आहेत.
- भाग्यलक्ष्मी साटम, 

सभापती, कणकवली

Web Title: 30 to 40 fever patient in Kankavali