किनाऱ्यांची धूप रोखण्यासाठी 40 कोटींचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

रत्नागिरी - समुद्राच्या उधाणामुळे जिल्ह्यातील पाच ते सहा ठिकाणचे धूपप्रतिबंधक बंधारे वाहून गेले आहेत. काही ठिकाणी किनाऱ्याची धूप झाल्यामुळे तेथे बंधारे घालण्याची गरज आहे. जिल्ह्यातील अशा ठिकाणांची मेरीटाइम बोर्डाने पाहणी केली असून सुमारे 40 कोटींचे वेगवेगळे प्रस्ताव शासनाला सादर केले आहेत. त्यामुळे हे किनारे भविष्यात सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.

यंदाच्या पावसाच्या हंगामात समुद्राला मोठे उधाण येण्याच्या तारखा काही दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाने जाहीर केल्या होत्या. हंगाम सुरू झाला आणि समुद्राच्या उधाणाने किनारपट्टी भागात धुमाकूळ घातला. सुमारे पाच ते आठ मीटर उंचीच्या लाटा किनाऱ्यावर येऊन आपटल्या. त्यामुळे जिल्ह्यात किनारा सुरक्षेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले धूपप्रतिबंधक बंधारे वाहून गेले. काही ठिकाणी किनाऱ्यांची मोठी धूप झाली आहे. येथील पत्तन विभागाकडे बंधाऱ्यांसंदर्भातील सर्व जबाबदारी आहे. जिल्ह्याच्या किनाऱ्याचे यंदा मोठे नुकसान झाल्याचे या खात्याने सांगितले.

काळबादेवी, मुरूगवाडा, पंधरामाड, मिऱ्या आदी भागातील सुमारे 400 मीटरचा बंधाऱ्याची धूप झाली आहे. जाकीमिऱ्या, भाटीमिऱ्या येथे सुमारे 450 मीटर बंधारा वाहून गेला आहे. या ठिकाणच्या बंधाऱ्याला सुमारे पंधरा ते वीस वर्षे लोटली आहेत. जिल्ह्याच्या किनारा सुरक्षेसाठी येतील पत्तन विभागाने वेगवेगळ्या ठिकाणचे सुमारे 40 कोटींचे प्रस्ताव शासनाला सादर केले आहेत. यामध्ये काळबादेवीचा 800 मीटरसाठी 6 कोटी रुपये, तेथे टेट्रापॉडची गरज आहे. पंधरामाड येथील 12 कोटी, जाकीमिऱ्या येथील 12 कोटी, वेळणेश्‍वर येथील 1200 मीटरच्या बंधाऱ्यासाठी 10 कोटींचा या प्रस्तावांचा समावेश आहे. करंजगाव (दापोली) या किनाऱ्याची तत्काल दुरुस्ती होणेदेखील महत्त्वाचे असल्याचे पत्तन विभागाने स्पष्ट केले.

Web Title: 40 crore proposal to prevent coast erosion