दापोली तालुक्यात निधीअभावी ४२ लोखंडी साकवांची दुर्दशा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

दाभोळ - दापोली तालुक्‍यातील सर्वसाधारणपणे ४२ लोखंडी साकव दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. शासनाकडून दुरुस्तीसाठी निधीच उपलब्ध होत नसल्याने धोकादायक बनलेल्या लोखंडी साकवांची दुरुस्ती रखडलेली आहे.

दाभोळ - दापोली तालुक्‍यातील सर्वसाधारणपणे ४२ लोखंडी साकव दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. शासनाकडून दुरुस्तीसाठी निधीच उपलब्ध होत नसल्याने धोकादायक बनलेल्या लोखंडी साकवांची दुरुस्ती रखडलेली आहे.

तालुक्‍यातील कर्दे येथे काही वर्षांपूर्वी अंत्यंयात्रेवेळी साकव कोसळून ग्रामस्थ मृतदेहासह खाली पडले होते. त्यानंतर या वर्षी ऐन शिमगोत्सवात आसूद गावातील झोलाई मंदिराकडे जाणाऱ्या नदीवरील साकव कोसळून अपघात झाला. त्यामुळे किती अपघात झाल्यावर सरकारी यंत्रणा जागी होऊन नादुरुस्त साकव दुरुस्त करणार आहे, हा प्रश्‍न आहे. पावसाळ्यापूर्वी नादुरुस्त साकवांची दुरुस्ती जिल्हा परिषद बांधकाम खात्याकडून न केल्यास पावसाळी हंगामात तालुक्‍यातील विविध भागातील नादुरुस्त साकव कोसळून दुर्दैवी घटना घडण्याचे गंभीर प्रसंग उद्‌भवण्याची शक्‍यता नाकारता येत नाहीत.

दापोलीत यापूर्वीही साकव मोडून अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे मोडकळीस आलेल्या साकवांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद बांधकाम खात्यामार्फत सर्व्हे करण्यात आला होता. त्यात अनेक गावातील नादुरुस्त साकवांची नोंदच करण्यात आली नसल्याची बाब यानिमित्ताने पुढे आली आहे. तरी जे साकव नादुरुस्त म्हणून जिल्हा परिषद बांधकाम खात्याने नोंद केले आहेत, निदान त्या नादुरुस्त साकवांची प्राधान्याने दुरुस्ती करून जनतेच्या जीवावर बेतणाऱ्या प्रसंगातून सुटका करावी, अशी माफक अपेक्षा तालुक्‍यातील ग्रामस्थांची आहे. आसूद हे गाव शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी दत्तक घेतले असून या साकव दुरुस्तीसाठी दोन वर्षापूर्वीच निधीची मागणी करण्यात आली होती; मात्र शासनाकडून निधीची उपलब्धता न झाल्याने अखेर हा साकव दुरुस्तीअभावी कोसळला आहे.

Web Title: 42 steel sakav pending by fund