रत्नागिरी : मिरजोळे एमआयडीसीत 45 लाखाचे कोकेन जप्त

राजेश कळंबटे
रविवार, 21 जुलै 2019

  • रत्नागिरीतील मिरजोळे औद्योगिक वसाहतीमध्ये ४५ लाखांचे 930 ग्रॅम कोकेन जप्त.
  • स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कारवाईत तिघेजण ताब्यात.
  • दिनेश शुबेसिंह (२३), रामचंद्र तुलीचंद मलिक (५१ दोघेही हरियाणा), सुनिलकुमार नरेंद्रकुमार रनवा (२६ शिखर-राजस्थान) अशी त्यांची नावे

रत्नागिरी - तालुक्यातील मिरजोळे एमआयडीसीमध्ये छापा टाकून कोकेनच्या विक्रीसाठी आलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा आणि ग्रामीण पोलीसांच्या पथकाने अटक केली. यामध्ये 45 लाख रुपये किंमतीचे सुमारे 930 ग्रँम कोकेन जप्त करण्यात आले. यामध्ये कोस्टगार्डच्या एका कर्मचार्‍याचा समावेश आहे. तो मूळचा हरियाणाचा असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. ही टोळी गजाआड झाल्यामुळे अंमली पदार्थ विक्रीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.

याप्रकरणी दिनेश शुभेसिंह (वय 23,  रा. हरियाणा),  सुनील कुमार नरेन्द्र कुमार रनवा (वय 26 , रा. जिल्हा शिखर राजस्थान), रामचंद्र तुळशीचंद मलीक (वय 51,  रा. सोनवद हरियाणा) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. रत्नागिरीत विक्रीसाठी कोकेन आणल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले. विशेष खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीनुसार उपविभागिय अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक शिरीष सासणे, पोलीस निरिक्षक सुरेश कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मिरजोळे एमआयडीसी येथे कोकेनची विक्री करण्यासाठी एक टोळी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि ग्रामीण पोलिसांची टीम तयार करून मिरजोळे  एमआयडीसीतील अग्निशामक दलाच्या कार्यालयाच्या मागील बाजूला सापळा रचण्यात आला. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास तीनजण रस्त्यावरील अंधारात कोणाची तरी वाट बघत उभे होते. पोलिसांनी त्या तिघांवर झडप टाकत ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर तिघांकडून 930 ग्रँम कोकेन आढळले. ते जप्त केले. किनारा सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी असलेल्या कोस्टगार्डचा कर्मचारी अंमली पदार्थ विक्रीच्या टोळीत सहभागी असल्याने खळबळ उडाली आहे.

हरियाणा, राजस्थान कनेक्शन
रत्नागिरी शहरासह परिसरात अंमली पदार्थांची छुपी विक्री सुरु आहे. गेल्या दोन वर्षात पाच ते सहा कारवाया करुन उध्वस्त करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी- कर्नाटक अशी अमली पदार्थ पुरवण्याची चेन असल्याचे त्यावेळी स्पष्ट झाले होते. एमआयडीसीतील कारवाईच्या निमित्ताने हरियाणा, राजस्थानमधील टोळी रत्नागिरीत सक्रिय झाल्याचे या निमित्ताने पुढे आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 45 lakh Rs Cocain Seized in Mirjole MIDC Ratnagiri