कासवांच्या ५५ पिलांचे संरक्षण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

राजापूर - तालुक्‍यातील किनारपट्टीवर वन विभागाने संवर्धित केलेल्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांच्या अंड्यातून बाहेर पडलेल्या ५५ पिलांचा समुद्राकडे झेपावणारा अनोखा प्रवास माडबनवासीयांनी सलग दुसऱ्या वर्षी ‘याची देही याची डोळा’ अनुभवला.

राजापूर - तालुक्‍यातील किनारपट्टीवर वन विभागाने संवर्धित केलेल्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांच्या अंड्यातून बाहेर पडलेल्या ५५ पिलांचा समुद्राकडे झेपावणारा अनोखा प्रवास माडबनवासीयांनी सलग दुसऱ्या वर्षी ‘याची देही याची डोळा’ अनुभवला.

वेळाससारख्या किनारी भागातील आढळणाऱ्या ऑलिव्ह रिडले प्रजातीचे कासव वा त्याची अंडी तालुक्‍याच्या किनारपट्टीवर यापूर्वी कधीही आढळली नव्हती. मात्र गतवर्षी प्रथमच माडबनच्या किनारपट्टीवर कासवाच्या या प्रजातीची अंडी काही स्थानिक ग्रामस्थांना आढळली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी म्हणजे या वर्षी ऑलिव्ह रिडले कासवाची अंडी माडबनच्या किनारपट्टीवर आढळली. वन विभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या साह्याने कासवाच्या मादीने अंडी घातलेल्या परिसरात श्‍वापदांसह अन्य कोणापासूनही धोका पोचू नये म्हणून जाळीच्या साह्याने घरटे करून संवर्धित केले. वाळूमध्ये असलेली ही अंडी उबण्यासाठी सुमारे ५०-५५ दिवसांचा कालावधी जातो. या कालावधीमध्ये संवर्धित केलेल्या घरट्यातील अंड्यांची कोणाकडून नासधूस केली जात नाही ना यावर येथील स्थानिक ग्रामस्थ शामसुंदर गवाणकर लक्ष ठेवून होते. श्री. गवाणकर यांना काल संवर्धित केलेल्या ठिकाणाच्या येथील अंड्यातून बाहेर पडलेली पाली समुद्राकडे झेपावण्याच्या तयारीत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर राजापूरच्या वनपाल राजश्री कीर, वनरक्षक सागर गोसावी, दीपक म्हादये, विजय म्हादये, माडबनचे सरपंच ओंकार वाघधरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर खड्ड्यामध्ये असलेल्या कासवाच्या पिलांची पाहणी केल्यानंतर त्या पिलांना सुरक्षितपणे समुद्रामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा केला.

त्याबरोबर तत्काळ ही पिले सहजरीत्या समुद्राकडे झेपावली. माडबन समुद्रकिनाऱ्यावर सलग दुसऱ्या वर्षी कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करण्यामध्ये वन विभागाने स्थानिकांच्या साह्याने बजावलेल्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Web Title: 55 tortoise chicks protection