विलवडेत ६.५ लाखांची दारू जप्त

विलवडे - येथे जप्त केलेली मोटार.
विलवडे - येथे जप्त केलेली मोटार.

एलसीबीची कारवाई - महामार्गालगतच्या बारबंदीनंतर पहिल्यांदाच मोठा छापा

बांदा - गोव्यातून आडमार्गाने गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करताना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत ६ लाख ५४ हजार ७२० रुपयांच्या दारूसह एकूण १२ लाख ५४ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई काल (ता.१२) रात्री ९.३० वाजता विलवडे तिठा येथे करण्यात आली. या प्रकरणी चालक दिनेश रमाकांत कोठावळे (वय ३३, रा. न्यू सबनीसवाडा, सावंतवाडी) याला अटक करण्यात आली. महामार्गावरील बार बंद करण्याच्या आदेशानंतर ही पहिली मोठी कारवाई आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक होत असल्याच्या घटना अनेक वेळा उघड होऊन कारवाया झाल्या आहेत. नुकताच न्यायालयाने महामार्गापासून ५०० मीटर परिसरातील बार बंद करण्याचा आदेश दिला. याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्र व राज्य शासनाकडून दिले. यात नंतरच्या काळात थोडी शिथिलताही आणण्यात आली; मात्र जिल्ह्यातील बहुसंख्य बार या निर्णयामुळे बंद झाले. आता चोरट्या दारू वाहतुकीला जोर चढला आहे. बहुसंख्य शहरांत छुप्या पद्धतीने दारूची विक्री सुरू आहे. बारसाठी अधिकृत दारूसाठा घेता येत नाही. त्यामुळे चोरट्या विक्रीसाठी गोवा बनावटीची दारूच वापरली जात आहे.

यासाठी या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे हवालदार एस. वाय. सावंत, पी. एस. सावंत, एम. एम. राऊत, एस. जे. पाटील, डी. ए. कांदळगावकर, पी. पी. वालावलकर हे बांदा- दाणोली मार्गावरून येणाऱ्या वाहनांची तपासणी करीत होते. रात्री ९.३० च्या सुमारास या मार्गावरून (एमएच ०७ पी ३३७४) ही मोटार येताना दिसली. या गाडीला तपासणीसाठी थांबविण्यात आले. गाडीच्या मागच्या हौद्याची तपासणी केली असता यात गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्‍स लपवून ठेवलेले आढळले.

या हौद्यात रियल व्हिस्की सेव्हन कंपनीच्या ७५० मिलीच्या २ लाख ८३ हजार २०० रुपये किमतीच्या ७०८ बाटल्या, गोल्ड अँड ब्लॅक थ्री एक्‍स रम कंपनीची ७५० मिलीच्या १ लाख ९८ हजार ७२० रुपये किमतीच्या ८२८ बाटल्या व गोल्डन एसी ब्लू फाइन व्हिस्की या कंपनीच्या १ लाख ७२ हजार ८०० रुपये किमतीच्या ४३२ बाटल्या अशी एकूण ६ लाख ५४ हजार ७२० रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली. या प्रकरणातील ६ लाखांची बोलेरो पिकअपही जप्त करण्यात आली.

तोडपाण्याला ऊत
बारबंदीबाबतच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य शहरांतील बार बंद झाले आहेत. असे असले तरी वाहनांमध्ये, बंद गोडावूनमध्ये दारूचा साठा करून वितरण सुरू आहे. यामुळे हप्तेबाजीही वाढली आहे. जिल्ह्यातील काही भागांत या चोरट्या दारूविक्री व्यवसायासाठी लाखो रुपयांचे तोडपाणी होत असल्याची चर्चा आहे.

मद्यपींच्या खिशाला चाट
जिल्ह्यातील मद्यपी लगतच्या गोव्यात जाऊन दारूची खरेदी करायचे. महाराष्ट्राच्या तुलनेत तेथे जवळपास निम्म्याने कमी दरात दारू मिळत असे; मात्र जिल्ह्याच्या सीमेलगत गोव्यात असलेले बहुसंख्य बार महामार्गाच्या जवळ होते. त्यामुळे ते बंद करण्यात आले आहेत. मद्यपींना जिल्ह्यातच चढ्या दराने आणि छुप्या मार्गाने मिळणारी दारू खरेदी करावी लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com