मुख्याध्यापकाला मारहाण करणाऱ्या 7 जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

चिपळूण : तालुक्‍यातील ओमळी येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक व प्रशासक एन. एम. माळवे यांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश ऊर्फ राजू दत्ताराम कदम, संभाजी पवार, सुरेश सावंत, सुनील सावंत, राजाराम सावंत, संतोष गणपत चव्हाण, प्रताप भोसले अशी संशयितांची नावे आहेत.

ओमळी येथील पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे गावातच न्यू इंग्लिश स्कूल आहे. संस्थेच्या कार्यकारी मंडळाची मुदत जानेवारी महिन्यात संपली. त्यामुळे संचालकांनी कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ नये, असे पत्र शिक्षण विभागाला दिले आहे. तसेच माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक माळवे यांच्यावर संस्थेचे प्रशासक म्हणून जबाबदारी सोपवली. तरीही शाळेच्या कामकाजात हस्तक्षेप करणाऱ्या काही संचालकांनी इंग्रजी विषयाचा शिक्षक नसल्याने पालक व विद्यार्थ्यांची बैठक बोलावली होती. बैठकीसाठी मुख्याध्यापक माळवे यांनी वर्गखोलीही उपलब्ध करून दिली होती; मात्र माळवे यांनी बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला होता. याचा राग येऊन सुरेश ऊर्फ राजू कदम, सुरेश सावंत व संभाजी पवार यांनी माळवेंना शिवीगाळ केली.

त्यानंतर संतोष चव्हाण, सुनील सावंत, प्रताप भोसले व राजाराम सावंत यांनी धक्काबुक्की केली. प्रताप भोसले व राजाराम सावंत यांनी घरी निघालेल्या माळवे यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. संभाजी पवार व सुरेश सावंत यांनी माळवे यांना गाडीतून बाहेर काढून पुन्हा धक्काबुक्की केली. याबाबत मुख्याध्यापक माळवे यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. 24) तक्रार दिली. याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन शेळके करीत आहेत.

Web Title: 7 charged for beating headmaster