दापोलीतील गोड स्ट्रॉबेरीतून ७० हजारांचे उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

कृषी विद्यापीठात लागवड - आगाऊ नोंदणी; चांगल्या प्रतीच्या उत्पादनासाठी संशोधन सुरू

दापोली - कोकणातील शेतकऱ्यांसाठी स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून हमखास नगदी उत्पन्नाचा नवीन मार्ग कृषी विद्यापीठाच्या जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभागाने यशस्वी प्रयोग करून दाखवून दिला आहे. दापोली येथील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या या विभागांतर्गत मागील तीन वर्षांपासून स्ट्रॉबेरी लागवडीचे डॉ. उत्तम कदम, प्रा. सुनील पाटील व डॉ. महानंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रिसिजन फार्मिंग टेक्‍निकद्वारे जास्तीत जास्त व चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळण्यासाठी संशोधन सुरू आहे. 

संशोधनांतर्गत महाविद्यालयाच्या परिसरात ४.५ गुंठे प्रक्षेत्रात स्वीट चार्ली जातीच्या स्ट्रॉबेरीची लागवड १ डिसेंबर २०१६ ला करण्यात आली होती. या प्रक्षेत्रातून ४२ व्या दिवशी १२ जानेवारीला पहिली तोडणी करण्यात आली. सद्यःस्थितीत तीनवेळा केलेल्या फळतोडणीत ३५ किलो उत्पादन आणि ७० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आकाराने मोठे, चवीला गोड आणि लाल भडक रंगाच्या फळाने महाविद्यालयाकडे आगाऊ नोंदणीने स्ट्रॉबेरीची मागणी होत आहे.

कोकणातील निचरा होणारी जमीन, स्ट्रॉबेरीसाठी सुयोग्य वातावरण, पाण्याची उपलब्धता व विकसित होणारे पर्यटन हे सर्वच घटक स्ट्रॉबेरीसारख्या पिकाला पोषक आहेत. स्वीट चार्ली स्ट्रॉबेरीचे वाण कोकणातील वातावरणामध्ये चांगले विकसित होते. स्ट्रॉबेरीसाठी सरासरी १५ ते ३० अंश तापमान आवश्‍यक असते. स्ट्रॉबेरीची रोपे शेतामध्ये लावल्यापासून २१ दिवसांनी फुले येण्यास प्रारंभ होतो. ४२ व्या दिवशी पहिली तोडणी घेता येते. समतोल अन्नद्रव्ये, पाणी व रोग, किडींचा योग्य बंदोबस्त केल्यास जून महिन्यापर्यंत सातत्याने उत्पादन घेऊ शकता येते. एक गुंठा क्षेत्रामध्ये ७७० रोपे लावता येतात. एका रोपापासून सरासरी ४५० ते ५०० ग्रॅमपर्यंत उत्पादन मिळते. एक गुंठा क्षेत्रामधून सरासरी १०० रुपये प्रतिकिलोप्रमाणे १८ ते २० हजारांचे उत्पादन मिळते.
 
स्ट्रॉबेरीचे पीक कोकणातील शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. शेतीचे शाश्‍वत उत्पन्न नसल्याने कोकणातील तरुण रोजगारासाठी मुंबई-पुणे येथे स्थलांतरित होतो. मात्र, याच तरुणांनी स्वीट चार्ली स्ट्रॉबेरीसारखी नगदी पिके काटेकोर पद्धतीने घेतल्यास प्रतिगुंठा १८ ते २० हजार रुपये उत्पादन मिळू शकते. 
- प्रा. डॉ. उत्तम कदम, विभागप्रमुख, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग, दापोली

प्रायोगिक तत्त्वावर लागवड केलेल्या स्वीट चार्ली स्ट्रॉबेरीच्या जातीची फळे रंगाने भडक, चवीला गोड आणि चांगल्या वजनाची आहेत. पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत ऑक्‍टोबर महिन्यात या प्रजातीची लागवड करणे शक्‍य आहे.
- प्रा. सुनील पाटील, सहायक प्राध्यापक, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, दापोली.

३५ किलो उत्पादन
४.५ गुंठे प्रक्षेत्रावर लागवड

१२ ला पहिली तोड

तीन वर्षे संशोधन

Web Title: 70 thousand income in strawbery