निवडणुकीसाठी जिल्ह्यात ८३८ मतदान केंद्रे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

प्रशासकीय तयारी - १६ पथकांची स्थापना; २१ ला मतदान; ५ लाख ५३ हजार मतदार

सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार असून निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्वतयारीनिशी सज्ज झाली आहे. मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यात ८३८ मतदान केंद्रे निश्‍चित केली आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोळा स्थायी व सर्वेक्षण पथकांची नियुक्ती केली असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण खाडे यांनी दिली.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला असून प्रशासनाकडून या निवडणुकीसाठी पूर्वतयारी युद्धपातळीवर सुरू आहे. यात ५ लाख ५३ हजार ६३१ मतदार हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी तिन्ही विधानसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे तीन मुख्य निरीक्षक निश्‍चित करण्यात आले आहेत. 

यामध्ये कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, सावंतवाडी-वेंगुर्ले विधानसभा मतदारसंघासाठी रायगडचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल गोटे तर कणकवली-देवगड विधानसभा मतदारसंघासाठी सिंधुदुर्गचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका शांततेत व सुरळीत होण्यासाठी तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी जिल्ह्यातील प्रमुख प्रवेशमार्गांवर आठ स्थायी सर्वेक्षण पथके कार्यरत राहणार आहेत. या पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यात मतांसाठी पैशाचे छुपे व्यवहार, दारू त्याचप्रमाणे मतदारांवर प्रभाव टाकू शकणारी साधने आदीचा शोध घेण्यात येणार आहे. 

जिल्ह्यातील निवडणूक प्रचारावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच आचारसंहिता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने आठ सर्वेक्षण पथकांची नेमणूक केली आहे. या पथकामध्ये प्रत्येकी एक विभागीय अधिकारी देण्यात आले असून त्यांना कार्यकारी दंडाधिकारी म्हणून अधिकार दिले आहेत. या पथकामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश असणार आहे.

नऊ विशेष कक्षांची स्थापना
जिल्ह्यातील आठही तहसील कार्यालयांमध्ये विशेष मदत कक्षाची स्थापना केली आहे. तर जिल्हा स्तरावरही एका मदत केंद्राची स्थापना केली आहे. अशा एकूण नऊ विशेष मदत केंद्रांमध्ये उमेदवारांना आवश्‍यकता भासल्यास मदत घेता येणार आहे.

सुटीच्या दिवशीही नामनिर्देशनपत्र स्वीकारणार
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत नामनिर्देशनपत्र ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहे. या कालावधीत ५ फेब्रुवारीला रविवार (सुटीचा दिवस) येत आहे. या दिवशी कार्यालयीन सुटी असली तरी या दिवशीही नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार आहेत, असे प्रवीण खाडे यांनी सांगितले.

Web Title: 838 voting center for election