ऑस्ट्रेलिया, अमेरिकेत ९० टन आंबा निर्यात

ऑस्ट्रेलिया, अमेरिकेत ९० टन आंबा निर्यात

रत्नागिरी - दरवर्षीप्रमाणे कोकणच्या हापूसची अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील निर्यात सुरू झाली आहे. वाशी येथील विकिरण केंद्रातून आतापर्यंत ९० टन आंबा पाठविण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक हापूसचा असून काही प्रमाणात केसरचाही समावेश आहे. स्थानिक बाजारातील दर वधारलेले असल्यामुळे निर्यातदारांकडून शेतकऱ्यांना गतवर्षीच्या तुलनेत ५० ते ६० रुपये किलोमागे अधिक मिळत आहेत.

कोकणासह देशात उत्पादित होणाऱ्या सर्व प्रकारच्या आंब्याना परदेशात मागणी आहे; मात्र हापूसला सर्वाधिक पसंती असते. चव, वास आणि रंग यामुळे खवय्यांची पहिली पसंती हापूसला आहे. 

कोकणातून सर्वाधिक हापूस वाशी बाजरात पाठविला जातो. तेथून स्थानिक बाजारपेठांसह आखाती देशात रवाना होतो. आखातात २५ टक्‍के, तर दहा ते पंधरा टक्‍के अमेरिका, ऑस्ट्रेलिया, लंडन, कॅनडाला निर्यात केला जातो. या वर्षी रत्नागिरी, देवगडसह अलिबागच्या आंब्याला हापूस नावाने जीआय मानांकन मिळाले आहे. दर्जा आणि दर या दोन्ही गोष्टींना महत्त्व आले आहे. वातावरणातील बदलांमुळे मार्च, एप्रिलमध्ये हापूसची आवक कमी आहे. उत्पादन निम्म्यावर आल्यामुळे निर्यातीसाठीही दर्जेदार फळ उपलब्ध करताना तारांबळ उडत आहे.

यंदा निर्यातीसाठी आवश्‍यक २२५ ग्रॅमपेक्षा जादा वजनाचे फळ अवघे तीस टक्‍केच आहे. तुलनेत १५० ग्रॅम वजनाचा आंबा सुमारे ४० ते ५० टक्‍के इतका आहे. २७५ ग्रॅम वजनाच्या आंब्याला परदेशात मागणी असते. निर्यातीसाठी उपलब्ध फळांमधून ग्रेडिंग केले जाते. उत्पादनच कमी झाल्याने स्थानिक बाजारातही यंदा गतवर्षींच्या तुलनेत जादा दर मिळत आहे. त्यामुळे निर्यातदार वाशी किंवा कोकणातील थेट शेतकऱ्यांकडून हापूस खरेदी करताना किलोला ५० ते ६० रुपये गतवर्षीच्या तुलनेत अधिक देत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २०० ग्रॅम वजनाला प्रतिडझन ६७५ रुपये, २४० ग्रॅमला ९५० रुपये, २७० ग्रॅमसाठी १४०० रुपये दर मिळत आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलियाला पाठविणाऱ्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया करावी लागते. वाशीत तशी यंत्रणा उभारण्यात आली आहे. आतापर्यंत नव्वद टन आंबा निर्यात झाला असून त्यातील ऐंशी टक्‍के हापूस आहे.

रत्नागिरीतून युकेला निर्यात
रत्नागिरीतील निर्यात प्रक्रिया केंद्रातून गेली दोन वर्षे तांत्रिक अडचणींमुळे निर्यात होत नव्हती. या वर्षी प्रथमच दोन कन्साईनमेंट इंग्लडला (युके), तर कॅनडाला एक पाठविण्यात आली आहे. उष्णजल प्रक्रियेची व्यवस्था या केंद्रात उपलब्ध आहे. इंग्लडसाठी ही प्रक्रिया अत्यावश्‍यक आहे.

स्थानिक बाजारातील दरांवर निर्यातदाराकडून आंबा विकत घेतला जातो. परदेशात त्याचे दर किती राहतात, यावर दर ठरत नाही. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांना जादा दर मिळत आहे.
- भास्कर पाटील,
उपसरव्यवस्थापक, पणन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com