सिंधुदुर्गातील ९५०० शेतकऱ्यांचे खावटी कर्ज माफ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

कणकवली - राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे खावटी कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. त्याचा फायदा जिल्ह्यातील ९५०० शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती जिल्हा बॅंकेचे संचालक अतुल काळसेकर यांनी येथे दिली.

कणकवली - राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे खावटी कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. त्याचा फायदा जिल्ह्यातील ९५०० शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती जिल्हा बॅंकेचे संचालक अतुल काळसेकर यांनी येथे दिली.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ जाहीर केली होती; मात्र या योजनेमधून अल्पभूधारक शेतकऱ्यांची खावटी कर्जे वगळण्यात आली होती. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत तीन ऑक्‍टोबर २०१८ ला खावटी कर्जे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयावर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्‍कामोर्तब करण्यात आले. उद्या (ता.१६) या बाबतचा शासकीय अध्यादेश जारी केला जाणार आहे.

श्री. काळसेकर म्हणाले, ‘‘कोकणातील सातबारांवर असंख्य नावे आहेत. अनेक जण अल्पभूधारक आहेत. या शेतकऱ्यांना जिल्हा बॅंकांमार्फत खावटी कर्ज मोठ्या प्रमाणात दिले जाते. सिंधुदुर्गात ९ हजार ५०० शेतकऱ्यांना सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून १३.५ कोटी खावटी कर्ज वाटप करण्यात आले होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ या योजनेत वगळण्यात आलेल्या खावटी कर्जाचा समावेश करण्याचे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे.’’

अल्पभूधारक शेतकऱ्यांचे खावटी कर्ज माफ करण्यात यावे यासाठी गेले दीड वर्ष सतत पाठपुरावा सुरू होता. बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, तसेच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार खावटी कर्जमाफीचा निर्णय होताच अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी या निर्णयाची माहिती स्वत: दूरध्वनी करून दिल्याचे श्री. काळसेकर म्हणाले.

खावटी कर्ज माफीनंतर आता काजू उत्पादक शेतकरी आणि कारखानदार तसेच माणगाव खोऱ्यातील आकारीपड जमीनधारक शेतकरी यांचा लढा लवकरच यशस्वी करू.
- अतुल काळसेकर,
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक संचालक

Web Title: 9,500 farmers Debt waiver of Sindhudurg