सिंधुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालयासाठी 991 कोटी 

विनोद दळवी 
Wednesday, 25 November 2020

जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी येथील नागरिकांची मागणी होती. यासाठी जिल्ह्यात जनरेटा तयार करण्यात आला होता. सह्यांची मोहीमसुद्धा राबविली होती. जनतेची मागणी लक्षात घेत खासदार विनायक राऊत यांनी यात पुढाकार घेत पाठपुरावा सुरु केला.

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता दिल्यानंतर राज्य सरकारने 991 कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला आज मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय होणार असल्याचे अधोरेखित झाले आहे. 

जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी येथील नागरिकांची मागणी होती. यासाठी जिल्ह्यात जनरेटा तयार करण्यात आला होता. सह्यांची मोहीमसुद्धा राबविली होती. जनतेची मागणी लक्षात घेत खासदार विनायक राऊत यांनी यात पुढाकार घेत पाठपुरावा सुरु केला. पालकमंत्री उदय सामंत यांनीही वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला प्रस्ताव सादर केला.

ऑक्‍टोबरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याला तत्त्वतः मान्यता देण्यात आली होती.  त्यानंतर सुरुवातीला हे वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयानजीक उभारण्याचा निर्णय झाला; मात्र परत हा निर्णय बदलत वैद्यकीय महाविद्यालय अन्य हलविण्याच्या हालचाली सुरु झाल्या; परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा रुग्णालय येथेच वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केल्याने हा प्रश्‍न मिटला. 

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सिंधुदुर्गात होऊ घातलेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी खर्चाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या बैठकीत 991 कोटी खर्चाला मान्यता देण्यात आली. पुढील तीन वर्षांत स्वतंत्र महाविद्यालय इमारत व सुविधा उभ्या राहणार आहेत. तोपर्यंत हे महाविद्यालय जिल्हा रुग्णालयात सुरु राहणार आहे. 

जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 991 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी दिली. जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आराखड्यासहित तातडीने प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याला मंजुरी देण्यात आली आहे. 

असा आहे प्रस्ताव 
*इमारत बांधकाम - 572 कोटी 
*महाविद्यालयीन अधिकारी-कर्मचारी खर्च - 118.55 कोटी 
*रुग्णालयीन अधिकारी, कर्मचारी खर्च - 109.19 कोटी 
*यंत्रसामुग्री उपकरणे - 120 कोटी 
*आवर्ती खर्च - 31.3 कोटी 
*बाह्यस्रोत खर्च - 15.31 कोटी 
 

- संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 991 crore for medical college in Sindhudurg