आदिवासींसाठी आयुष्य लावले पणाला (व्हिडिओ)

आदिवासींसाठी आयुष्य लावले पणाला (व्हिडिओ)

सावंतवाडी -  कोणताही भक्कम आर्थिक आधार नसतानाही तो आपल्या पत्नीच्या साथीने कातकरी मुलांना माणसात आणण्याचा प्रयत्न करतोय. सिंधुदुर्गातील कातकरी समाजाच्या उन्नतीसाठी त्याने केलेले काम आभाळाएवढे. मात्र, कसलीही अपेक्षा न बाळगता उदय आईर आणि त्यांच्या पत्नी सौ. ऊर्जा यांनी सुरू केलेल्या या कार्याला मदतीचे हात मिळाले तर ती नक्कीच चळवळ बनेल आणि जनावरांचं जीणं जगणाऱ्या कातकरी समाजातील मुलांना "माणसा सम वागण्याचा' मार्ग दिसेल. 

सिंधुदुर्गात कातकरी समाजाची दोन हजार 132 इतकी लोकसंख्या आहे. साडेआठ लाख लोकसंख्येच्या जिल्ह्याच्या दृष्टीने हा खूपच लहान आकडा. पण, 15-20 वर्षांपूर्वीचे त्यांचे जगणे पाहिले तर त्याला "अमानवी आयुष्य' हेच शब्द लागू पडावेत. "गावोगाव फिरणारे वानरमारे' या ओळखीपलीकडे पिढ्यान्‌पिढ्या जगूनही आपले वेगळे अस्तित्व निर्माण करू शकले नव्हते. या समाजाचे दुःख कुसगावमध्ये राहणाऱ्या उदय आईर यांना प्रथम दिसले. सर्वसामान्य कुटुंबातील असूनही त्यांनी आपले आयुष्यच या समाजाच्या उन्नतीसाठी पणाला लावले. 2007 पासून रानोमाळ पसरलेल्या या समाजाला माणसात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. व्यसनाधीनता, रानटी आयुष्य यात अडकलेल्या, विविध अनिष्ट प्रथा तर नित्याच्या झाल्या होत्या. त्यातून बाहेर काढण्यासाठी जिल्ह्यात पसरलेल्या 27 वस्त्यांवर त्यांनी काम सुरू केले. गेल्या बारा वर्षांत वानरमारे यांना कातकरी अशी शासन दरबारी ओळख मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले. 

हा समाज व्यसनाधीनतेतच अडकलेला आहे. गरिबीमुळे त्याचे शोषण सुरूच आहे. शिक्षण हाच यावरील उपाय असल्याचे आईर यांच्या लक्षात आले. कातकरी समाजातील नव्या पिढीला शिक्षण प्रवाहात आणण्याची दिशा त्यांनी निश्‍चित केली. रानोमाळ भटकणाऱ्या या समाजाच्या मुलांना शाळेशी जोडणे सोपे नव्हते. त्यांच्यासाठी स्वतंत्र शिक्षण व्यवस्था करणे अवघड होते; पण उदय आईर यांचा निश्‍चय पक्का होता. त्यांची सहचारिणी सौ. ऊर्जा यांनी त्यांना खंबीर साथ दिली. यातून कातकरी मुलांसाठी वसतिगृहाची संकल्पना पुढे आली. पण, जागा व इमारत उपलब्ध नव्हती. त्यामुळे अडचणी कायम होत्या. 

आईर यांची प्रामाणिक धडपड पाहून नर्सरी व्यावसायिक बबन कदम यांनी आपले वेताळ बांबर्डेतील मांगर वजा जुने घर या वसतिगृहासाठी तात्पुरते उपलब्ध करून दिले. तेथे 2015 मध्ये आईर यांच्या शोषित मुक्ती अभियान संस्थेचे "नाग्या महादू निवासी वसतिगृह' सुरू झाले. तुटपुंज्या पैशातून स्वच्छतागृहाची व्यवस्था केली. मुलांची काळजी घ्यायला आईर दांपत्य तयार होते; पण वसतिगृहात मुले आणणे सोपे नव्हते. आईर यांनी कातकरी वस्त्यावर जाऊन पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवण्याचा प्रयत्न केला. अखेर वसतिगृहात 10-15 मुले आली. त्यांची जवळच्या प्राथमिक शाळेत शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. 

आव्हाने इथून आणखी सुरू झाली. या मुलांना शैक्षणिक साहित्य, जेवण-खाण याची बेगमी करायला दानशूरांवरच अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे आजही त्यांच्या जेवणासाठी प्रयत्न करावे लागतात. पण, याचबरोबर या मुलांना टिकवणे अवघड होते. जंगलात राहिलेल्या या मुलांना दात घासण्यापासून आंघोळीपर्यंतचे धडे द्यावे लागले. यातील मोठी मुले व्यसनांकडे वळणार नाहीत, याची काळजी घेणे कसरतीचे ठरले. आईर दांपत्याने या मुलांना आपल्या संसारात सामावून घेतले; पण ही मुले अधून-मधून पळून जाऊ लागली. त्यांना शोधताना पोलिस ठाण्याची पायरीही चढावी लागली. मात्र, आईर दांपत्याने आपली लढाई सोडली नाही. 

या मुलांसाठी आईर यांना कायमस्वरूपी वसतिगृह बांधायचे आहे. त्यासाठी वेताळबांबर्डेतच बबन कदम यांनी पाच गुंठे जागा दिली. पण, प्रश्‍न पैशांचा आहे. आईर यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना आता समाजानेच हात द्यायला हवा. 

कातकरी समाजासाठी मी करीत असलेल्या प्रयत्नांना जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांची चांगली साथ मिळाली. या समाजात प्रगतीची, विकासाची, शोषित मुक्तीची किमान जाणीव निर्माण व्हावी, अशी माझी इच्छा आहे. आज मी एकटा या समाजासाठी प्रयत्न करतोय. उद्या या समाजातीलच असे अनेक कार्यकर्ते तयार होतील व शोषण झुगारून टाकतील, असा मला विश्‍वास आहे. 
- उदय आईर, शोषित मुक्ती अभियान संस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com