आंबोलीत पावसाचे रडत खडत शतक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

१०८ इंचापर्यंत मजल - पुढच्या टप्प्यात जोर वाढण्याची शक्‍यता; वातावरण बदलाचा परिणाम

आंबोली - राज्यात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या आंबोलीने यंदा रडत खडत सरासरीमध्ये इंचाचे शतक गाठले आहे. इथला पाऊस १०८ इंचापर्यंत पोहोचला असून तुलनेत हे प्रमाण कमी आहे.

१०८ इंचापर्यंत मजल - पुढच्या टप्प्यात जोर वाढण्याची शक्‍यता; वातावरण बदलाचा परिणाम

आंबोली - राज्यात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या आंबोलीने यंदा रडत खडत सरासरीमध्ये इंचाचे शतक गाठले आहे. इथला पाऊस १०८ इंचापर्यंत पोहोचला असून तुलनेत हे प्रमाण कमी आहे.

राज्यात सर्वाधिक पाऊस आंबोलीत पडतो. साधारण जूनमध्येच इंचांचे शतक गाठले जाते. येथे सरासरी पावणेतीनशे ते तीनशे इंचापर्यत पाऊस होतो. पहिल्या टप्प्यातील पाऊस दमदार असतो. जून संपेपर्यंत इंचांचे शतक गाठलेले असते. गेल्यावर्षीही आतापर्यंत साधारण दीडशे इंचापर्यंत पाऊस गेलेला होता. यंदा मात्र आजपर्यंत अवघा १०८ इंच पाऊस झाला आहे.

वातावरणातील बदलाचा हा परिणाम असल्याचे म्हटले जात आहे.
पावसाचे प्रमाण कमी असल्याचा फायदा वर्षा पर्यटनाला मात्र होताना दिसत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा अतिउत्साही पर्यटकांचा धिंगाणा कमी आहे. आता श्रावण अवघ्या आठ दिवसावर आला आहे. श्रावणात पावसाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे सरासरीच्या जवळ पोचण्यासाठी कदाचित पुढच्या टप्प्यात येथे मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्‍यता आहे.

आंबोलीचे पाणी जाते कुठे?
येथे मुसळधार पाऊस पडत असला तरी घाटमाथ्यावरुन हे पाणी आंबोलीच्या चारही बाजूंना पसरते. येथील पावसाचे पाणी दाणोलीमार्गे तेरेखोल नदीतून समुद्राला जाऊन मिळते. तर कोल्हापूरकडच्या बाजूचे पाणी हिरण्यकेशी नदीमधून आजरा रामतीर्थ येथून गडहिंग्लजकडे जाते. चौकुळच्या बाजूकडील पाणी घटप्रभा नदीतून चंदगडच्या दिशेने जाते. यंदा पाऊस विश्रांती घेऊन पडत असल्याने नुकसानाची तीव्रता कमी आहे.

आंबोलीत साधारण १ जून ते १ नोव्हेंबरपर्यंत पाऊस मोजला जातो. गेल्यावर्षी २७३ इंच पाऊस झाला. यंदा पाऊस कमी आहे; मात्र आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेता पाऊस किमान अडीचशे इंचापर्यंत पोहोचेल. यामुळे पुढच्या टप्प्यात मोठ्या पावसाची शक्‍यता आहे.

- प्रल्हाद ऊर्फ भाऊ ओगले, पर्जन्यमापक, आंबोली

Web Title: aamboli konkan news rain in aamboli