esakal | आरे-वारेला CRZ चा खो; प्रकल्प होणारच, शिक्षणमंत्र्यांचा संकल्प
sakal

बोलून बातमी शोधा

Uday Samant

आरे-वारेला CRZ चा खो; प्रकल्प होणारच, शिक्षणमंत्र्यांचा संकल्प

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : पर्यटन वाढीच्या दृष्टीने तालुक्यातील आरे-वारे (Aare-Ware) येथील प्रस्तावित प्राणी संग्रहालयाला सीआरझेडचा (CRZ)खो मिळाला आहे. ही जागा सीआरझेड-१ मध्ये येत असल्याने येथे कच्चे किंवा पक्के बांधकाम करता येणार नाही. त्यामुळे प्रस्तावित जागा रद्द करून दुसरी जागा शोधण्याची वेळ आली आहे; मात्र काही झाले तरी प्राणी संग्रहालय करणार, असा संकल्प उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सोडला आहे. लवकरच जागेची पूर्तता होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांनी येथे थांबावे यासाठी सामंत यांची धडपड सुरू आहे. रोजगार निर्मिती आणि त्या अनुषंगाने असलेल्या व्यवसायाला चालना मिळून आर्थिक स्तर सुधारण्याच्यादृष्टीने हे प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी तालुक्यातील ढोकमळे (आरे-वारे जवळ) येथे २० एकर जागेत प्राणी संग्रहालय उभारण्याचा प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव सेंट्रल झू अ‍ॅथॉरिटीला पाठवण्यात आला होता. संग्रहालयात वेगवेगळ्या प्रकारचे ४५ प्राणी असणार आहेत. कोरोनामुळे जमीन मोजणी लांबली होती. त्या जागेमध्ये १८८ हिस्सेदार होते त्यांना नोटीस पाठवून जागेची मोजणी करण्यात आली होती.

याबाबत मंत्री सामंत यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली होती. बैठकीला उपवनसंरक्षक क्लेमेट बेन, भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक मगर, विभागीय वनाधिकारी खाडे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, वास्तूविशारद व संबंधित अधिकारी उपस्थित होते; मात्र आरे-वारेतील ही २० एकरची जागा सीआरझेड-१ मध्ये येते. त्यामुळे तेथे कच्चे किंवा पक्के बांधकाम करता येणार नाही, असे केंद्राने कळवल्याने प्राणी संग्रहालयासाठीची निश्चित केलेली ही जागा रद्द करावी लागली आहे. प्रशासन पर्यायी जागेच्या शोधात असुन लवकरच जागा निश्चित केली जाणार आहे.

हेही वाचा: रत्नागिरी : प्राण्यांच्या अवयवाची तस्करी करणारे तिघे ताब्यात

पर्यायी जागेचा शोध सुरू

प्राणी कुठून आणि कसे आणायचे, त्यामध्ये कोणकोणते प्राणी असणार, रत्नागिरीत कोणते मिळतील, मुंबई व इतर ठिकाणी कोणते, याची यादी काढण्यात आली आहे. बर्ड पार्क, स्नेक पार्कही तिथे उभारण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने आणि वनविभागाने पत्राद्वारे केंद्राला कळविले होते. मात्र आता प्राणी संग्रहालयासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तालुक्यातील आरे-वारे येथील प्राणी संग्रहालयाची जागा सीआरझेड-१ मध्ये येते. तेथे कच्चे किंवा पक्के बांधकाम करता येणार नाही. त्यामुळे प्रस्तावित ही जागा रद्द करण्यात आली आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने पर्यायी जागा लवकरच निश्चित करून तसा प्रस्ताव पाठविण्यात येईल.

-उदय सामंत- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री

loading image
go to top