esakal | 'अखेर जाल्यात मासोली घावली' चिंगळं मिळाल्याने मच्छीमार समाधानी
sakal

बोलून बातमी शोधा

above 100 fishermen found 30 to 35 kg fish in see and happy after long time in ratnagiri

25 ते 50 किलोपर्यंत चिंगळं मिळाल्याने मच्छीमार समाधानी झाले आहेत.

'अखेर जाल्यात मासोली घावली' चिंगळं मिळाल्याने मच्छीमार समाधानी

sakal_logo
By
राजेश कळंबट्टे

रत्नागिरी : हंगाम सुरु झाल्यानंतर समुद्र खवळलेला होता. त्यामुळे गिलनेटधारकांसह रापणकार मच्छीमारांना मासळी मिळत नव्हती. त्यामुळे मासेमारीवर अवलंबून असलेले छोटे मच्छीमार धास्तावलेले होते; परंतु वादळ शांत झाल्यानंतर रविवारी रत्नागिरीतील शंभरहून अधिक मच्छीमारांच्या गणपतीपुळे जवळ व्हाईट चिंगळं जाळ्याला लागली. 25 ते 50 किलोपर्यंत चिंगळं मिळाल्याने मच्छीमार समाधानी झाले आहेत.

हेही वाचा - सुनीसुनी पर्यटनस्थळे लागली खुणावू, व्यावसायिकांचे काय मत? वाचा ...

ऑगस्टपासून ट्रॉलिंग, गिलनेटसह होडक्याद्वारे मासेमारीला अधिकृत परवानगी मिळाली. परंतु पावसाळी वातावरण आणि अचानक आलेल्या वादळांमुळे समुद्र खवळलेलाच होता. नौका बुडण्याच्या भितीने अनेक छोटे मच्छीमार समुद्रात जात नव्हते. गणेशोत्सव आला तरीही वातावरण निवळत नव्हते. समुद्र खवळल्यामुळे मासळीही मिळत नव्हती. छोटे मच्छीमार किनार्‍यापासून जास्तीत जास्त 10 वाजेपर्यंतच मासेमारीसाठी जातात. त्यापुढे खोल समुद्रात ट्रॉलिंगवाले मासेमारी करतात. यंदाच्या मोसमात छोट्या मच्छीमारांना म्हणावी तशी मासळी मिळत नव्हती. अधुनमधून टायनी चिंगळं आणि विविध प्रकारची मासळी जाळ्यात लागत होती. त्यातुन जाण्या-येण्याचा खर्चही मिळत नव्हता.

मात्र रविवारी समुद्र शांत असल्याचा फायदा घेत स्वार झालेल्या छोट्या मच्छीमारांना गणपतीपुळेजवळ व्हाईट चिंगळं जाळ्यात सापडली. चिंगळं मिळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर साखरतर, वरवडे, काळबादेवी, मिर्‍या येथील सुमारे शंभरहून अधिक गिलनेट धारक मच्छीमारांना हा चिंगळांचा प्रसाद मिळाला. व्हाईट चिगळांचा आकार 4 ते 5 इंच इतका असून किलोचा दर 510 रुपये मिळत आहे. एका किलोत 30 ते 40 चिंगळं बसतात. यंदाच्या हंगामात एकाचवेळी मच्छीमारांना एवढ्या प्रमाणात मासळी मिळालेली नव्हती. त्यामुळे मच्छीमारांसाठी रविवार स्पेशल होता. त्या एकाच दिवशी मासळी मिळाल्याने मच्छीमारांना चांगला फायदा झाला आहे. कोरोनाच्या कालावधीत आर्थिक घडी बिघडलेली असल्याने छोटे मच्छीमार संकटात सापडलेले आहेत. व्हाईट चिंगळं कायमस्वरुपात सापडली तर चांगला फायदा होऊ शकतो. सध्या ट्रॉलिंगला 'चालू' चिंगळ मिळत असून किलोला 90 रुपये दर मिळत आहे.

वादळ पथ्थ्यावर 

वादळामुळे समुद्र खवळलेला होता. या परिस्थितीत मासळी प्रवाहाबरोबर पुढे सरकत राहते किंवा ती किनार्‍याकडे वळते, मात्र हे वादळ छोट्या मच्छीमारांच्या पथ्थ्यावर पडले आहे. वादळ शांत झाल्याने मासळी किनारी भागाकडे वळल्याने व्हाईट चिंगळं मच्छीमारांच्या जाळ्यात सापडू लागली आहेत असा अंदाज मच्छीमारांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा -  नागदेवतेचा तीन दिवस बाप्पासोबत मुक्काम, कुटुंबाची पाचावर धारण..

 आजपासून पर्ससिननेटला प्रारंभ

पर्ससिननेटद्वारे मासेमारीला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. खलाशांच्या अडचणीवर मात करण्यासाठी या मच्छीमारांना कसरत करावी लागत आहे. काहींनी आधीच खलाशांना आणल्यामुळे 30 टक्के मच्छीमार समुद्रात जातील असा अंदाज आहे. पर्ससिननेट मासेमारी सुरु झाल्यानंतर इतर मच्छीमारांना मासळी मिळत नाही. यामुळे मच्छीमारांमध्ये संघर्षाला सुरवात होते.

संपादन ः स्नेहल कदम 

loading image