महाडमध्ये अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांवर कारवाई

mahad
mahad

महाड : महाड नगरपालिका हद्दीतील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे हटविण्याची मोहिम महाड नगरपालिकेने आज सकाळपासून दणक्यात सुरू केली आहे. महाड नगरपालिकेच्या या कारवाईमुळे धास्तावलेल्या अनेक दुकानदारांनी अतिक्रमणे स्वतःच काढण्यास सुरूवात केली आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

महाड शहरातील बाजारपेठ व अन्य मार्गांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. यात बहुसंख्य दुकानदारांनी गटारांवर तसेच गटाराबाहेर पत्र्याच्या शेड काढल्या आहेत. तर पायऱ्यांवरही अनेक अतिक्रमणे झाली आहेत. महाड नगरपालिकेने याबाबत शहरातील दुकानदार तसेच नागरिकांना जाहीर आवाहन करून आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून टाकण्याबाबत कळविले होते. परंतु काही ठराविक नागरिकांनीच आपली अतिक्रमणे काढली. परंतु उर्वरित अतिक्रमणे तशीच होती.

अखेर नगरपालिकेने आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार आज 11 डिसेंबर पासुन 13 डिसेंबर या कालावधीत अतिक्रमणे हटविण्याची मोहिम सुरू केली आहे. आज सकाळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, नगर अभियंता सुहास कांबळे, तसेच पालिकेचे कर्मचारी व कामगार यांनी चोख पोलीस बंदोबस्तात आपल्या कारवाईला सुरूवात केली. दोन जेसीपी व तीन डंपर या ठिकाणी आणण्यात आले. शहरातील महात्मा गांधी मार्गावर पिंपळपारापासून अतिक्रमणे तोडण्यास सुरूवात झाली.गोकूळ हाँटेल,कलश कापड दुकान,गुरुकृपा ज्वेलर्स पासुन दुकानाच्या पाट्या, बाहेर आलेली शेडस, शटर्स जेसीपीच्या सहाय्याने तोडण्यात सुरुवात करण्यात आली. हे सर्व सामान डंपरमध्ये भरून पालिकेच्या जागेत टाकण्यात येत आहे.

अतिक्रमणे तोडण्यास सुरूवात होत असल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. बाजारपेठेतील व्यापारी आपली अतिक्रमणे काढण्यास स्वतःहून पुढे येऊ लागले. भगवान दास बेकरी परिसर, शिवाजी चौक, छत्रपती शिवाजी मार्ग, व मुख्य बाजारपेठेत नागरिकांनी  आपली अतिक्रमणे काढण्यास सुरूवात केली. महाड मधील बाजारपेठ मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाच्या विळख्यात आल्याने वाहतूक कोंडी तर होतच होती परंतु पादचा-यांना चालणेही अवघड होत होते. या तीन दिवसांच्या कारवाईत टप-या.खोके,पत्राशेड,अनधिकृत भंगार गोदामे, अनधिकृत टॉवर, गुरांचे गोठे व शहराच्या सुशोभिकरणात व स्वच्छता उपक्रमात बाधा आणणारी बांधकामे हटवली जाणार आहेत. या कारवाईदरम्यान केवळ प्रशासनच रस्त्यावर दिसत होते. राजकिय हस्तक्षेप होऊ नये यासाठी एकही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हता.पिपंपळपार ते नवेनगर नाका,चवदार तळे ते बसस्थानक व सर्व मध्यवर्ती ठिकाणी हि कारवाई सुरु राहणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com