जुगार, मटक्याच्या टपऱ्या बंद, अवैध धंदेवाल्यांना पळताभूई थोडी

भूषण आरोसकर
Thursday, 17 September 2020

नगराध्यक्षांच्या इशाऱ्यानंतर आठवड्याभरात शहरामध्ये गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस ठाण मांडून आहेत.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण आणि येथील पोलिसांनी जुगार मटका, अवैध धंद्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली. यामुळे येथील मटका, जुगाराला चांगलाच आळा बसला आहे. दहा दिवसांपासून मटका स्वीकारणाऱ्या टपऱ्या बंद आहेत. या कारवाईत सातत्य ठेवावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यक्‍त करत आहेत. 

येथील नगराध्यक्ष संजू परब यांनी गोवा बनावटीच्या दारू विरोधात थेट पोलिस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम व राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना टार्गेट करत शहरातील खुलेआम विक्री होणाऱ्या गोवा बनावटीच्या दारूवर कारवाई न झाल्यास दारूच्या बाटल्या कुरिअर करू, असा इशारा दिला होता. नगराध्यक्षांच्या इशाऱ्यानंतर आठवड्याभरात शहरामध्ये गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस ठाण मांडून आहेत. त्यांनी आत्तापर्यंत येथील पोलिसांच्या मदतीने शहरातील तसेच शहराबाहेरील गावांमध्ये अवैध धंद्याविरोधात मोहीम हाती घेतली आहे. 

मुळात ही मोहीम स्वागतार्हच आहे; मात्र नगराध्यक्ष परब यांनी उठवलेल्या आवाजानंतर सुरू झालेली ही मोहीत किती सातत्य राखेल, हा प्रश्‍न आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत वेळोवेळी प्रसारमाध्यमांतून प्रकाशझोत टाकण्यात आला; मात्र त्यावेळी अशी कारवाई कुठे दिसली नव्हती; मात्र उशिरा का होईना, पोलिस अधीक्षकांनी सुरू केलेली मोहीम जनहिताची असून अशा सर्वच अवैध धंद्याची पाळेमुळे त्यांनी खोदून काढावीत, अशी मागणी सध्या होत आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि येथील पोलिसांकडून शहरासह गावागावांमध्ये होणाऱ्या कारवाईचा धसका मटका जुगारवाल्यांनी घेतल्यापासून सद्यस्थितीत शहरातील तसेच ग्रामीण भागातील अवैध धंदे बंद पाडले आहेत. त्यामुळे या अवैध धंद्यांमध्ये गुंतलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. 

दारू वाहतूक सुसाट 
दुसरीकडे नगराध्यक्ष परब यांनी गोवा बनावटीच्या अवैध दारू विक्रीबाबत आवाज उठवला होता; मात्र शहरात अशा अवैध दारू विक्रीवर कारवाई होताना मात्र दिसली नाही. त्यामुळे गोवा बनावटीच्या दारूची दिवस रात्र वाहतूक होते. याची पोलिस अधीक्षक तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाळेमुळे खोदून काढावी, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे. 

सावंतवाडी शहरासह तालुक्‍यात सुरू केलेली अवैध धंद्याविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहील. मटका, जुगारासह दारू धंद्यावरही पोलिसांची करडी नजर असून कोणाचीही गय केली जाणार नाही. 
- दीक्षित कुमार गेडाम, पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग 

 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action on illegal work in Sawantwadi