ब्रेकिंग : नाणार समर्थकांची सेनेतून हकालपट्टी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

action on the nanar supporters in rajapur kokan marathi news

शिवसैनिक आणि पदाधिकार्‍यांच्या  बदलेल्या भूमिकेवरून सेना नेतृत्वाची कोंडी झालेली असतानाच प्रकल्प समर्थक पदाधिकार्‍यांविरोधात शिवसेनेने कारवाईचा बडगा उगारला आहे.

ब्रेकिंग : नाणार समर्थकांची सेनेतून हकालपट्टी...

राजापूर (रत्नागिरी) : शिवसेनेची नाणार रिफायनरी प्रकल्पविरोधी भूमिका असताना शिवसैनिक आणि पदाधिकार्‍यांकडून नाणारचे जोरदार समर्थन करत प्रकल्पासाठी आग्रह धरला जात आहे. शिवसैनिक आणि पदाधिकार्‍यांच्या या बदलेल्या भूमिकेवरून सेना नेतृत्वाची कोंडी झालेली असतानाच प्रकल्प समर्थक पदाधिकार्‍यांविरोधात शिवसेनेने कारवाईचा बडगा उगारला आहे. सागवे विभागप्रमुखांची पदावरुन तडकाफडकी काढण्यात आले असून त्यांच्या जागी तत्काळ नियुक्ती केली गेली आहे. शिवसेनेच्या धडक कारवाईमुळे समर्थन करणार्‍यांना चाप बसणार आहे.

नाणार रिफायनरी रणकंदन
जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी सागवे विभागप्रमुख राजा काजवे यांच्या जागी कमलाकर कदम यांची नियुक्ती करत असल्याचे पत्र मंगळवारी (ता. 19) काढले आहे. त्यामुळे राजापूरमध्ये खळबळ उडाली आहे. नाणार रिफायनरी मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून रणकंदन माजले आहे. शिवसेनेने नाणारविरोधात भूमिका घेतलेली असतानाच सामना वृत्तपत्रात आलेल्या जाहीरामुळे नाणार समर्थक आणि विरोधक पुन्हा चाळवले गेले. त्यानंतर गेले दोन दिवस कोकणातील वातावरण चांगलेच तापले होते. शिवसेनेतील काही पदाधिकारी समर्थनार्थ रिंगणात उतरल्यामुळे त्याला वेगळेच वळण लागले. या पार्श्‍वभुमीवर कोकण दौर्‍यावर असलेले शिवसेना पक्षतप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भुमिकेकडे लक्ष लागले होते; परंतु ठाकरे यांनी नाणारचा विषय संपल्याचे जाहीर केल्यामुळे दोन दिवसाच्या नाट्यावर पडदा पडला.

हेही वाचा- नाणारसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांची  राजीनामा देण्याची तयारी....

विरोधात कारवाईचे धाडस करणार का?
नाणार रिफायनरीसाठी शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांकडून विकासासाठी नाणार हवा अशी आग्रही भूमिका घेतली आहे. या पदाधिकार्‍यांनी सिंधूदूर्ग येथे बॅनर फडकावून नाणारचे जाहिररीत्या समर्थनही केले. पक्षविरोधी भूमिका घेणार्‍या पदाधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे संकेत खासदार विनायक राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी दिले होते. त्यामुळे सेना नेतृत्व खरोखरच पक्षविरोधी भूमिका घेणार्‍या पदाधिकार्‍यांच्या विरोधात कारवाईचे धाडस करणार का? याची सार्‍यांना उत्सुकता होती.

मुख्यमंत्री मुंबईला रवाना झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी सेना नेतृत्वाने पक्षविरोधी भूमिका घेणार्‍यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. सागवेचे विभागप्रमुख राजा काजवे यांना तडकाफडी पदावरुन काढून टाकत कमलाकर कामत यांची नियुक्ती केली आहे. प्रकल्प समर्थकांच्या विरोधात संघटनेकडून कारवाई सुरू झाल्यामुळे समर्थक पदाधिकारी आणि शिवसैनिक कोणती भूमिका घेणार? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

 हेही वाचा- शिव प्रेमींना करावे लागले प्रतीकात्मक आंदोलन..


कमलाकर कदम सागवेचे नवे विभागप्रमुख

नाणार प्रकल्पविरोधी शेतकरी, मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष कमलाकर कदम यांची निवड करण्यात आली आहे. पंचायत समितीचे माजी अध्यक्ष असलेले श्री. कदम यांनी नाणार रिफायनरी विरोधात नाणार परिसरात आंदोलन उभारण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. नाणार रिफायनरी विरोधात त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिकात घेतली आहे.

वरीष्ठयांच्या सूचनेनुसार कारवाई

नानार रिफायनरीच्याबाबत पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांच्या विरोधात वरीष्ठयांच्या सूचनेनुसार कारवाई करण्यात आली आहे. उर्वरीत पदाधिकाऱयांबाबत तालुकाप्रमुखांकडून सविस्तर अहवाल आल्यानंतर योग्य ती पुढील कारवाई केली जाईल .....

विलास चाळके, शिवसेना जिल्हाप्रमुख