अनधिकृत वाळू उपशावर कारवाई होणार

चिपळूण, खेड तहसीलदारांचे पथक; खनिकर्मकडून सूचना
 illegal land extraction
illegal land extractionsakal

चिपळूण : वाशिष्ठी खाडीत सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी चिपळूण व खेडच्या तहसीलदारांना सूचना केली आहे, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रदीप पाटील यांनी ‘सकाळ’ला दिली. चिपळूण व खेड तालुक्यांच्या खाडीपात्रात काही महिन्यांपासून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी खेड आणि चिपळूणच्या तहसीलदारांना कारवाईच्या सूचना केल्या. खेड आणि चिपळूण तालुक्यांतील खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वाळू उपसा होत आहे.

त्यामुळे ज्यांनी हातपाटीने वाळू उपसा करण्यासाठी शासनाची रॉयल्टी भरली आहे, अशा व्यावसायिकांवर अन्याय होत आहे. शासनाची रॉयल्टी न भरता भरमसाट दराने वाळू उपसा करून त्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रॉयल्टीधारक व्यावसायिकांकडून केली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात वाळूला चांगला दर मिळत असल्यामुळे मोठ्या ट्रकांमधून ही वाळू पश्चिम महाराष्ट्रात पाठवली जात आहे. गुहागर तालुक्यात अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या बोटी महसूलच्या पथकांनी पकडल्या; मात्र चिपळूण व खेड तालुक्यांत एकदाही कारवाई झालेली नाही. ट्रकमधून वाळू वाहतूक सुरू असल्याची कोणालाही शंका येऊ नये, म्हणून ट्रकवर ताडपत्रीसारखे मोठे कापड टाकले जात आहे. या संदर्भातील वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रदीप पाटील यांनी घेतली. चिपळूण व खेड तालुक्यांतील अनधिकृत वाळू उपशावर कारवाई करण्याची सूचना त्यांनी दोन्ही तहसीलदारांना केली.

मंडळ अधिकाऱ्यांवर जबाबदारी

महसूलचे पथक तयार करण्याची सूचना जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे खाडीपट्ट्यात जिथे अनधिकृत वाळू उपसा होत आहे, तेथील मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी आली आहे. तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून कारवाई केली जाणार आहे.

मुंढे भागात गाड्या ग्रामस्थांनी अडवल्या

गोवळकोटमधून पाटण (जि. सातारा) भागात वाळूची वाहतूक करणाऱ्या चार मोठ्या गाड्या मुंढे भागात काही ग्रामस्थांनी अडवल्या होत्या. गुहागर-विजापूर मार्गावरील मुंढे पुलावर या गाड्या थांबवल्या होत्या. या गाड्यांमध्ये किती वाळू आहे, वाळू वाहतुकीचा परवाना आहे का, याची माहिती ग्रामस्थांनी चालकाला विचारल्यावर मला काहीच माहिती नाही, मला केवळ पाटण तालुक्यातील एका व्यक्तीचा फोन नंबर देण्यात आला आहे, तो सांगेल त्या ठिकाणी ट्रक खाली करण्याची सूचना करण्यात आल्याचे ट्रकचालकाने सांगितले. हे ट्रक नंतर सोडण्यात आले; मात्र पश्चिम महाराष्ट्रात गोवळकोट येथून अनधिकृत वाळूची वाहतूक होते, हे यावरून स्पष्ट झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com