आदिती तटकरे : वादळग्रस्तांच्या अडचणी समजून भरपाई द्या , कोणीही वंचित न ठेवण्याच्या प्रशासनाला सूचना

सचिन माळी
Monday, 27 July 2020


नुकसानग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर भरपाई मिळावी यासाठी नियोजनात्मक कामाला गती द्यावी असे सांगितले. 

मंडणगड (रत्नागिरी) : निसर्ग चक्री वादळात नुकसानग्रस्त, दुखापतग्रस्त झालेल्या नागरिकांना सुरू असलेली मदत निधीत  येणाऱ्या अडचणी समजून लवकर निधी उपलब्ध देण्याच्या सूचना राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी तालुका प्रशासनाला दिल्या. तसेच नुकसानग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर भरपाई मिळावी यासाठी नियोजनात्मक कामाला गती द्यावी असे सांगितले. त्या २६ जुलै रोजी मंडणगड येथे निसर्ग चक्री वादळ निधी वाटप आढावा बैठकीत बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, प्रांताधिकारी शरद पवार, बाबाजी जाधव, संजय कदम, नायब तहसीलदार दत्तात्रय बेर्डे, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंडणगड येथील बचत भवनात आयोजित बैठकीत पर्यटन, फलोत्पादन, वादळ नुकसान भरपाई अशा विविध विभागाचा आढावा घेण्यात आला. बैठकीला महावितरणचे अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. माजी जिल्हा परिषद सदस्या अस्मिता केंद्रे यांनी तुळशी, पाले, आंबवणे खुर्द व अन्य गावातील नागरिकांना अजूनही घरांच्या नुकसानीची रक्कम मिळाली नसल्याचे सांगत वीज पुरवठा सुरळीत न झाल्याचे मंत्री, अधिकाऱ्यांसमोर मांडले. तसेच काही घरांचे नुकसान अधिक झाले असून त्यांना मिळालेली रक्कम ही अत्यंत तुटपुंजी असल्याचे सांगत त्याचे पुनरावलोकन व्हावे अशी मागणी केली.

हेही वाचा- कणकवली शहरांमध्ये एक नियम आणि सावंतवाडी शहरामध्ये वेगळा नियम  असे का ...? -

आपात्काळात प्रशासनाने केलेल्या कामाचे कौतुक केले. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण यांनी तालुक्यातील अजूनही बंद अवस्थेत असणाऱ्या घरातील मुंबईकर चाकरमानी आता गावाकडे आले असून अशा घरांचे पंचनामे करण्याची मागणी करीत वादळात दुखापत ग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहच करावी अशी मागणी केली. तसेच आंबडवे व मंडणगड किल्ल्यावरील गणपती मंदिर या पर्यटन स्थळांचा विकास रखडला असून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी असे सांगितले. माजी आमदार संजय कदम यांनी तालुक्यातील गोरगरीब नागरिकांना अजूनही धान्य व रॉकेल शासनाने मंजूर केल्याप्रमाणे मिळाले नसल्याचे सांगत नुकसानग्रस्त गावांच्या बाबतीत दुजाभाव होवू नये अशी सूचना मांडली. 

हेही वाचा- प्रकल्प नको तर, जनतेला सेना नको  कोणी दिला इशारा वाचा.... -

क्रीडा संकुळाचा निधी पडून
 तालुक्याला क्रीडा संकुलासाठी ५० लाखांचा निधी मंजूर झाला असून तो कित्येक वर्षे असाच पडून आहे. त्यासाठी संबंधित विभागाकडून जागेसंदर्भात अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचे पुन्हा एकदा बैठकीत स्पष्ट झाले. या विषयावर अपेक्षित चर्चाच झाली नसल्याने क्रीडा संकुलाचा विषय तसाच भिजत पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-राजवाडे यांची मुख्यमंत्र्यांना विनंती : अमरनाथची यात्रा रद्द होते, पंढरपूरची वारी रद्द झाली, मग हे विकतचे दुखणे का... -

जिल्हा नियोजन निधी वाढीव मिळण्यासाठी प्रयत्न करणार
  माजी सभापती भाई पोस्टुरे यांनी शासकीय इमारतींच्या नुकसानी संदर्भात विषय मांडला असता, समाज मंदिरे, स्मशानभूमी, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालये यांचा समावेश शासकीय इमारतीमध्ये असल्याने त्यांची दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करताना इतर जिल्ह्याच्या तुलनेत जिल्हा नियोजनाचा वाढीव निधी रत्नागिरीला मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले. तसेच आप्तकाळात तात्पुरत्या काळासाठी इमारती उपलब्ध करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली असल्याचे स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditi Tatkare meeting Various sectors tourism horticulture storm compensation reviewed at Bachat Bhavan in mandangad