सरकारला नरबळी हवे होते..म्हणून ही वेळ आली!

सरकारला नरबळी हवे होते..म्हणून ही वेळ आली!

चिपळूण : तिवरे गावाला उशाशी धरण हा शाप ठरला. मात्र, याला कारण सरकारी यंत्रणा आहे. या ढिम्म यंत्रणेला बहुदा नरबळी हवे होते. म्हणून आमच्यावर ही वेळ आणली. धरणाच्या सुरवातीपासून ते गेली 18 वर्षे आमची फसवणूकच सुरू आहे, अशा शब्दात धरणग्रस्तांनी आपली कैफीयत मांडली.

'सकाळ'ने याबाबत सातत्याने आवाज उठवला होता. 'धरणाला धोका आहे', हे मे महिन्यापासून वारंवार बजावून सांगितले होते. मात्र, सरकारी यंत्रणेवर त्याचा थोडाही परिणाम झाला नाही. धरण फुटल्यानंतरही सरकारी अभियंता सांडव्यावरून पाणी गेले असेल, धरण फुटणारच नाही, असे ठामपणे सांगत होता. त्याचवेळी गावात हाहाकार उडाला होता. सरकारच्या या संवेदनाहीन कारभाराचा पाढाच धरणग्रस्त सतत वाचत आहेत. 

वाचलेल्या कुटुबातील 40 जणांचे स्थलांतर शाळेत केले आहे. त्यांच्याशी बोलताना प्रशासनाविषयीचा राग त्यांच्या शब्दाशब्दांतून जाणवत होता. आधी पुनर्वसन करा, मग धरण. ही मागणी मान्य झालीच नाही. गावकऱ्यांना फसवूनच संमत्ती मिळवण्यात आली. धरण तिवऱ्यात, सह्या मात्र आकल्यात, अशा शब्दात कुटुंबीय गमावलेल्या रोहिणी गायकवाड यांनी नेमके वर्णन केले. धरणासाठीच्या सह्या आकलेत नेऊन रात्री बैठकीत घेण्यात आल्या, असा संदर्भ त्यांनी सांगितला.

धरणाला विरोध नव्हता. पण आधी पुनर्वसन होऊद्या, असा आग्रह धरण्यास आबाजी शिंदे परोपरीने सांगत होते. मात्र, आकलेत नेऊन अशिक्षित गावकऱ्यांच्या सह्या करून झाल्या. प्रशासनाने या घरांचे तेथून पुनर्वसन करण्याचे सूतोवाचही कधी केले नाही. त्यांना तेथून हलावे लागेल, असे कधीही सांगितले नाही. धरणाची उंची कमी केली. आकार कमी केला. धरण घरांपासून 160 फूट मागे नेले. आता कोणताही धोका घरांना नाही,याची छातीठोक ग्वाही प्रशासनाने दिली होती. आमची फसवणूक अशी दीर्घकाळ सुरू आहे. अशी पुस्ती त्यांनी जोडली. 

दरवर्षी प्रशासन धोकादायक स्थितीतून स्थलांतर करा, अशा नोटीसा देते, अशी माहिती प्रशासनाने दिली. मात्र हे धांदात खोटे आहे. असे सांगत दहा बारा धरणग्रस्त उठले. असे असेल तर आम्हाला त्यांनी नोटीसा दाखवाव्यात. आम्हाला एकही नोटीस मिळालेली नाही. हा सरकारचा आणखी एक खोटेपणा. त्यांनी समोर यावे, असे आव्हानच त्यांनी दिले. 

20 एकर भातशेतीही पाण्याखाली 
गायकवाड या कुटुबाची सर्वाधिक जमीन धरणासाठी गेली. आता 20 एकर भात जमीन पाण्याखाली गेली, आई-वडीलही गमावले. आम्हाला सरकारने नोकरीही दिली नाही. प्रत्येक गोष्टीत फसवणूक सुरूच. मे महिन्यापासून ते धरण फुटण्याआधी दोन दिवसापर्यंत धरणाबाबत ओरड सुरू होती. मे महिन्यात डागडुजी केली ती काय, धरणाला धोका नाही, सांगितले ते काय, अशा प्रश्‍नाची सरबत्ती करीत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. शाळेत स्थलांतर झालेला प्रत्येक गावकरी त्यांचे म्हणणे बरोबर आहे, असे सांगत होता. या सरकारने आमचा विश्‍वासघात केला आहे. असा आरोप आम्ही करतो. सरकारी यंत्रणेला येथे येऊदेत, असे तेथील प्रत्येकजण ठणकावून सांगत होता. 

मंत्र्यांना यायला वेळ नाही 
महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरूणीने अगदी स्पष्ट शब्दात राग व्यक्त केला. ती म्हणाली, आमच्याकडे लक्ष देण्यास यंत्रणेला वेळ नाही. काल (ता.3) मंत्री येऊन गेले. पडझड झाली ते पाहून आले, असे कळले. मात्र, जी माणसेच कोसळली आहेत. त्यांच्याकडे येण्यास त्यांना वेळ झाला नाही. इकडे ते फिरकले नाहीत. खासदार राऊत येऊन गेले. त्यांनी अवस्था पाहिली आहे. त्यांच्याकडून तरी अपेक्षा ठेवावी काय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com