पालिकेच्या मुख्य इमारतीसह चार इमारती बनल्या डेंजर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

रत्नागिरी : नगरपालिकेच्या मुख्य इमारतीसह 2 नंबर शाळा, भाजी मार्केट आणि आठवडा बाजारातील शॉपिंग सेंटरच्या इमारती वापरासाठी धोकादायक बनल्या आहेत. त्यांचे बांधकाम एवढे जीर्ण झाले आहे, की त्यांची आता दुरुस्तीही होण्यासारखी नाही, असा इमारतींचा धक्कादायक स्ट्रक्‍चरल ऑडिटचा अहवाल पालिकेला प्राप्त झाला आहे. त्यामुळे नूतन नगराध्यक्षांसह नव्या नगरसेवकांपुढे इमारतींबाबत नवे आव्हान उभे राहिले आहे.

मुंबईसह अनेक शहरांमध्ये जुन्या इमारती कोसळून जीवितहानी झाल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. या प्रकारांना पायबंद बसविण्यासाठी अशा इमारतींचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. त्यानुसार काही महिन्यांपूर्वीच पुणे येथील 'केबीपी स्ट्रक्‍चरल सिव्हिल इंजिनिअर सर्व्हिसिंग' या कंपनीतर्फे रत्नागिरी शहरातील काही इमारतींचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले. त्यामध्ये पालिकेची मुख्य इमारत, शाळा क्रमांक 2 ची इमारत, नवे भाजी मार्केट आणि आठवडा बाजारातील शॉपिंग सेंटरच्या इमारतींचा समावेश आहे. अत्याधुनिक उपकरणाद्वारे हे ऑडिट करण्यात आले. इमारतीच्या पिलरपासून इमारतीचे बांधकाम आणि त्यातील स्टीलची तपासणी करण्यात आली. 

तीन महिन्यांपूर्वी हे स्ट्रक्‍चरल ऑडिट झाले. त्याचा अहवाल पालिका प्रशासनाला प्राप्त झाल्याचे समजते. पालिकेची मुख्य इमारत 1971 मधील आहे. 45 वर्षांमध्ये या इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. ठिकठिकाणी स्लॅब निघून आतील स्टील उघडे पडले आहे. स्लॅब दरवर्षी गळतो. अनेक ठिकाणी इमारतीला भेगा गेल्या आहेत. त्यामुळे ही इमारत वापरास योग्य नाही. बांधकाम एवढे जीर्ण झाले आहे, की त्याची दुरुस्तीही होण्यासारखी नाही, असे अहवालात म्हटले आहे. इतर तीन इमारतींचीदेखील तशीच अवस्था आहे. या इमारती पाडण्याखेरीज पर्याय नसल्याचे स्ट्रक्‍चरल ऑडिटमध्ये स्पष्ट केले आहे. उद्या (ता. 23) नूतन नगराध्यक्ष राहुल पंडित कार्यभार स्वीकारणार आहेत. त्यांच्यापुढे हा प्रश्‍न तातडीने सोडविण्याचे आव्हान असेल. 

नव्यांच्या भूमिकेकडे लक्ष 
स्ट्रक्‍चरल ऑडिटचा अहवाल गंभीर आहे. या इमारती दुरुस्त करण्यासारख्या नसल्याने त्या पाडून नव्याने बांधणे हाच उपाय असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनासह नूतन नगराध्यक्ष, नगरसेवक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Administrative buildings in Ratnagiri on the verge of collapsing