सेवानिवृत्त शिक्षकांनाही त्रिस्तरीय निवडश्रेणीचा फायदा
शिक्षकांच्या निवडश्रेणीसाठी आवश्यक शासनविहीत निवडश्रेणी प्रशिक्षण न होताच सेवानिवृत्त झालेल्या कोकणातील हजारो शिक्षकांना प्रशिक्षणातून सूट देण्याबरोबच त्रिस्तरीय निवडश्रेणी लागू करण्यात येणार आहे. या संदर्भात कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नानंतर शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी तत्काळ अध्यादेश काढणार असल्याचे स्पष्ट केले. या निर्णयाचा फायदा कोकणाप्रमाणेच राज्यातील हजारो सेवानिवृत्त शिक्षकांना होणार आहे. या निर्णयाचे पालघर जिल्हयातील शिक्षकांनी स्वागत केले आहे.
सफाळे - शिक्षकांच्या निवडश्रेणीसाठी आवश्यक शासनविहीत निवडश्रेणी प्रशिक्षण न होताच सेवानिवृत्त झालेल्या कोकणातील हजारो शिक्षकांना प्रशिक्षणातून सूट देण्याबरोबच त्रिस्तरीय निवडश्रेणी लागू करण्यात येणार आहे. या संदर्भात कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नानंतर शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी तत्काळ अध्यादेश काढणार असल्याचे स्पष्ट केले. या निर्णयाचा फायदा कोकणाप्रमाणेच राज्यातील हजारो सेवानिवृत्त शिक्षकांना होणार आहे. या निर्णयाचे पालघर जिल्हयातील शिक्षकांनी स्वागत केले आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षक संख्येच्या 20 टक्के शिक्षकांना त्रिस्तरीय निवडश्रेणीचा लाभ देण्याची तरतूद आहे. त्यानुसार वरिष्ठ श्रेणीत 12 वर्षांची अर्हताकारी सेवा, शासनविहीत सेवांतर्गत प्रशिक्षण (निवडश्रेणी प्रशिक्षण) पूर्ण आणि त्या संवर्गातील उच्च शैक्षणिक अर्हता धारण अशा तीन अटी आहेत. त्यातील निवडश्रेणी प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडून वर्ग आयोजित करावे लागतात. मात्र, राज्यात 2009 अखेरपर्यंत निवडश्रेणी प्रशिक्षणवर्गाचे आयोजन करण्यात आले नाही. त्यामुळे हजारो शिक्षक केवळ दोन अटी पूर्ण करुन निवृत्त झाले. त्यांना आर्थिक लाभ न मिळताच नाईलाजाने निवृत्त व्हावे लागले.
सिंधुदुर्गासह कोकणातील पाच जिल्ह्यातील हजारो शिक्षकांना शासनाच्या अनास्थेचा फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन वसंत डावखरे यांनी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. तसेच त्यांचे कोकणातील सेवानिवृत्त शिक्षकांना बसलेल्या आर्थिक फटक्याकडे लक्ष वेधले. त्याचबरोबर सेवानिवृत्त झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना शासनविहीत निवडश्रेणी प्रशिक्षणातून सूट देण्याची आग्रही मागणी केली.
निवडश्रेणी प्रशिक्षण न घेतल्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या लाभापासून वंचित राहावे लागले होते. या शिक्षकांना आता ही वेतनश्रेणी लागू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे असे मत पालघर जिल्हयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी व्यक्त केले आहे.