आगाशे विद्यामंदिरात घडताहेत ‘वाचकवीर’

मकरंद पटवर्धन
शनिवार, 8 एप्रिल 2017

रत्नागिरी - वाचाल तर वाचाल, ग्रंथ हेच गुरू असे म्हटले आहे ते खरेच आहे. कारण माहितीचा खजिना व अनुभूती देणारी पुस्तके अनेक संस्कार करत माणूस घडवतात. याच हेतूने भारत शिक्षण मंडळाच्या कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात १९८७ पासून स्वामी विवेकानंद ग्रंथालय कार्यरत आहे. या ग्रंथालयाने ६५० विद्यार्थ्यांमधून ६४ वाचकवीर विद्यार्थ्यांची निवड केली. मुलांचा पाया भक्कम होतानाच वाचनाची आवड निर्माण करण्याचे काम हे ग्रंथालय करीत आहे, अशी माहिती मुख्याध्यापिका शीतल काळे यांनी दिली.

या सुसज्ज ग्रंथालयात पाच हजार पुस्तके असून पूर्णवेळ ग्रंथपाल आहे. जोडाक्षरविरहित बालगोष्टींपासून ते ५०० इसापनीती, साहित्यिक, शास्त्रज्ञ यावर पुस्तके आहेत. पहिलीच्या मुलांसाठी चित्ररूप गोष्टी, दुसरीसाठी छान छान गोष्टी, अकबर बिरबल, तिसरी-चौथीसाठी इसापनीतीपासून शास्त्रज्ञांची माहिती देणारी पुस्तके आहेत. चौथीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासात आहे. त्यामुळे महाराज व मावळ्यांवर चरित्रात्मक पुस्तके आहेत. म्हणी, वाक्‌प्रचारांची ओळख करून देणाऱ्या गोष्टी, बोक्‍या सातबंडे, वैज्ञानिक खेळ, प्रयोग या पुस्तकांना जास्त मागणी असते. चरित्रात्मक, बोधात्मक, वर्णनात्मक, माहितीपर, वैज्ञानिक, मनोरंजन अशी वैविध्यपूर्ण पुस्तके आहेत. त्या त्या इयत्तेप्रमाणे पुस्तकांची देवघेव केली जाते. सर्व वर्गांना, विद्यार्थ्यांना वाचायला मिळायला हवे यासाठी आठवड्याचे वेळापत्रक आखले आहे. तिसरी-चौथीच्या वर्गात वाचलेल्या पुस्तकातून टिपण काढण्याचा प्रयत्न व सराव चालू असतो, असे ग्रंथपाल सौ. आभा घाणेकर यांनी सांगितले.

वाचायला आणखी प्रोत्साहित करण्यासाठी, वाचनाचे महत्त्व वाढविण्यासाठी ‘वाचकवीर’ स्पर्धा सुरू केली. जूनमध्ये पुस्तक देवघेव सुरू होते. फेब्रुवारीत वाचकवीर स्पर्धा होते. वर्षभर कोणती व किती, कशी पुस्तके वाचली, याचा आढावा घेतला जातो. प्रत्येक वर्गातून दहा विद्यार्थी निवडून ग्रंथपाल परीक्षा घेतात. त्यातून सर्व वाचकवीर निवडले जातात. शिक्षक व पालकांसाठीही कथा, कादंबरी, चरित्र, ललित लेख आदी वैविध्यपूर्ण स्वरूपाची १८०० पुस्तके आहेत.

Web Title: agashe school reader