स्वतंत्र कोकणसाठी महामार्ग रोखणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

..तर निवडणुका लढवणार
मराठा समाजाची नोकरीत 16 टक्के आरक्षणाची मागणी आहे. स्वतंत्र राज्य झाले तरच मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ होईल. कोकणातील आमदारांना या राज्याचे महत्त्व समजले आहे; पण ते पक्षीय राजकारणामुळे एकत्र येत नाहीत. पश्‍चिम महाराष्ट्रासह इतरत्र विकासकामांसाठी एकी दिसते. अशी एकी आमदार, लोकप्रतिनिधींनी दाखवली पाहिजे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्यासाठीही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.

रत्नागिरी - स्वतंत्र कोकण राज्याच्या मागणीसाठी पुढील महिन्यात मुंबई-गोवा महामार्ग रोखण्यात येणार आहे. महामार्गावर किमान 50 ते 60 ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थांनी एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने आंदोलन केले जाणार आहे.

आंदोलनाकरिता संघर्ष समितीच्या सभा पाच जिल्ह्यांमध्ये होत आहेत. यातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती प्रा. महेंद्र नाटेकर यांनी दिली.
मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांचे मिळून स्वतंत्र कोकण राज्य व्हावे, अशी मागणी गेल्या 15 वर्षांपासून सुरू आहे; मात्र शासनाने याकडे अद्याप लक्ष दिलेले नाही. भाजप छोट्या राज्यांसाठी आग्रही आहे. यामुळे हा विषय मार्गी लागण्याची आशा कोकणवासीय बाळगून आहेत. 720 किलोमीटर लांब व 65 किलोमीटर्स रुंदीच्या कोकण राज्यासाठी 2003 पासून छोटी आंदोलने सुरू आहेत. नवीन राज्यनिर्मितीसाठी घटनेने दोन निकष दिले आहेत. बहुसंख्य लोकांची मागणी व राज्य चालवण्यासाठी त्या प्रदेशाची आर्थिक क्षमता हवी. हे दोन्ही निकष कोकण पूर्ण करेल. त्यामुळे सनदशीर मार्गाने आंदोलन केले जाणार आहे, असे नाटेकर म्हणाले.
शेती, उद्योग, शिक्षण, दळणवळण या बाबतीत कोकण मागासच राहिले आहे. बेळगावचा समावेश कोकणात केल्यास सीमाप्रश्‍नाचा गुंताही सुटू शकतो. यापूर्वी मिझोरम, छत्तीसगड, झारखंड, उत्तरांचल, तेलंगण या दहा राज्यांतील जनतेने आंदोलन केल्याने राज्य अस्तित्वात आले. त्याप्रमाणे कोकणच्या लढ्यात विद्यार्थ्यांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन नाटेकर यांनी केले.

Web Title: Agiation for Independednt Konkan