'पॅनकार्ड' ठेवीदारांचा ठिय्या सुरूच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

मालवण - पॅनकार्ड क्‍लब्ज्‌ कंपनीकडून ठेवीदारांच्या पैशाचा परतावा मिळावा यासाठी गुंतवणूकदारांनी येथील हॉटेल सागर किनारा येथे छेडलेले ठिय्या आंदोलन गेले सहा दिवस सुरू आहे."पॅनकार्ड'चे संचालक अथवा शासनप्रमुखांनी आंदोलनातील ठेवीदारांची साधी चौकशी करण्याचे सौजन्यही दाखवले नाही. येत्या दोन दिवसांत ठेवीदार जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही ठेवीदारांचा प्रश्‍न मार्गी लागला नाही तर 18 ला जिल्हाधिकारी कार्यालयातच ठेवीदार ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा गुंतवणूकदारांतर्फे राजा गावकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. हॉटेल सागर किनारा येथे आज पत्रकार परिषद झाली. या वेळी अवधूत चव्हाण, नाना कुमठेकर, महादेव तळवडेकर, प्रमोद नाईक, मिलिंद कडू, परेश तारी, उदय घाटवळ, दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी गावकर म्हणाले, ""आज ठिय्या आंदोलनाचा सहावा दिवस तर भजन आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. पॅनकार्डच्या ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी शासनाकडे निवेदने दिली; परंतु शासनाने लक्ष दिले नाही.''
आंदोलनात 400 पेक्षा जास्त ठेवीदार सहभागी झाले होते. विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ठेवीदारांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. परंतु एवढे होऊनही शासनाला जनतेच्या प्रश्‍नांबाबत कोणतीही सहानुभूती नसल्याचे चित्र आहे.

शहरात पॅनकार्डच्या ठेवीदारांनी गेले सहा दिवस ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या ठेवीदारांच्या समस्या काय आहेत, हे तहसीलदारांनी जाणून घेणे गरजेचे होते. पण तहसीलदार या ठिकाणी फिरकलेच नाहीत. त्यामुळे पॅनकार्डच्या ठेवीदारांचा अपेक्षाभंग झालेला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री, सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाचे आमदार, खासदार यांनी पॅनकार्डच्या ठेवीदारांच्या समस्येकडे लक्ष दिलेले नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असंख्य ठेवीदारांच्या रकमांचा परतावा पॅनकार्डकडून मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील आमदार, खासदार लक्ष देतील का, असा प्रश्‍न ठेवीदारांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Agiation of PANCARD investers