भंगसाळ नदी गाळप्रश्‍नी कुडाळात जल आंदोलन 

भंगसाळ नदी गाळप्रश्‍नी कुडाळात जल आंदोलन 

कुडाळ - भंगसाळ नदीतील गाळ उपसा पार्श्‍वभूमीवर आज जिल्हा प्रशासन यंत्रणेने दुर्लक्ष केल्यामुळे अखेर कुडाळवासीय, सर्वपक्षीय, व्यापारी यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नदीच्या पात्रात आगळंवेगळं जल आंदोलन केले. 

जिल्हा प्रशासन, दिलीप बिल्डकॉनच्या विरोधात घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधले. अखेर एक ते दीड तासानंतर दिलीप बिल्डकॉनने येत्या तीन दिवसांत गाळ उपसा पूर्णपणे काढला जाईल, असे सांगत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले. तर तीन दिवसांत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राजीव बिले, रणजित देसाई यांनी दिला. 

कुडाळ शहराची भंगसाळ नदी शहरवासीयांसाठी महत्त्वाचं पात्र आहे. चौपदरीकरणामुळे दिलीप बिल्डकॉन कंपनीने केलेल्या कामाचा सगळा भराव नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात होता. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपल्याने हा भराव काढणे गरजेचे होते; मात्र जिल्हा प्रशासन व दिलीप बिल्डकॉन यंत्रणा याबाबत चालढकलपणा करीत होती.

येथील नागरिक, सर्वपक्षीय यांनी याबाबतचे आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते; मात्र याबाबत कोणतीही पावले उचलली गेली नाही. दोन दिवसांपूर्वीच गाळ उपसाबाबत पुन्हा सर्वाचे लक्ष वेधण्यासाठी कार्यवाही न झाल्यास पाण्यात उतरून जल आंदोलन करण्याचा इशारा सर्वांनी दिला होता. अखेर आज सकाळपर्यंत कोणतीच कार्यवाही न झाल्याने अखेर येथील नागरिक, लोकप्रतिनिधी, व्यापारी, सर्वपक्षीयांनी नदीच्या पात्रात उतरून आगळेवेगळे जलआंदोलन केले. यावेळी जिल्हा प्रशासन व दिलीप बिल्डकॉनच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 

आंदोलन सुरू असताना तासभरानंतर चौपदरीकरणाचे संबंधित श्री. महाजन घटनास्थळी आले. याबाबत त्यांनी दिलेल्या उत्तरांनी आंदोलक संतप्त झाले. या हायवेचा संबंधित अधिकारी नसताना सर्वसामान्य माणसाला महत्वाच्या प्रश्‍नांसाठी पाठविणे ही आंदोलकांची चेष्टा आहे, अशी संतप्त भावना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांनी व्यक्त केली. अखेर दीड तासानंतर दिलीप बिल्डकॉनचे रवी कुमार घटनास्थळी आले. त्यांनी येत्या तीन दिवसांत भराव व गाळ उपसा मोहीम राबवली जाईल, असे आश्‍वासन दिले. त्यांनी तत्काळ कामाला सुरुवात केल्याने अखेर आंदोलन मागे घेण्यात आले. 

आंदोलनातील सहभाग 
या आंदोलनात जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, काका कुडाळकर, नगराध्यक्ष ओंकार तेली, राजीव बिले, गजानन कांदळगावकर, संजय भोगटे, प्रमोद भोगटे, राकेश कांदे, बाबल पावसकर, राजन बोभाटे, संध्या तेरसे, बाबल गावडे, संजय पिंगुळकर, साक्षी सावंत, सुनील बांदेकर, बाबा पोरे, मेघा सुकी, दिपलक्ष्मी पडते, सुरेश राऊळ, सचिन सराफदार, नागेश नेमळेकर, सुप्रिया मेहता, प्रसाद पडते, रोहन कुडाळकर, प्रसाद कोरगावकर, एकनाथ पिंगुळकर, सर्वपक्षीय सहभागी झाले होते. 

लोकप्रतिनिधींचा निषेध खपवणार नाही! 
आंदोलनात सर्व पक्षांचा सहभाग असताना कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी काका कुडाळकर यांनी घटनास्थळी वैयक्तिक स्वरुपात येथील लोकप्रतिनिधींचा निषेध केल्याचे संजय भोगटे यांनी सांगितले. हे आंदोलन सर्वपक्षीय आहे. मी एक शिवसेनेचा पदाधिकारी आहे. लोकप्रतिनिधींचा केलेला निषेध खपवुन घेणार नाही. आम्हालाही शिवसेना स्टाईलने आंदोलन करता येते, असे सांगितल्याने या वादाच्या मुद्‌द्‌यावर पूर्णविराम मिळाला. दरम्यान, कुडाळकर यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधींच्या नावाचा उल्लेख केला नसल्याचे स्पष्ट केले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com