esakal | कोकणात आंदोलक संतप्त : 'आम्हाला हलक्यात घेऊ नका' ; आंदोलकांचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Agitation for Maratha reservation Announcing the entire Maratha community rushed to the Collector office for Maratha reservation

विलंबामुळे जिल्हाधिकार्‍यांना अडवण्याचा प्रयत्न

मराठा आरक्षणासाठी आंदोलन; मोर्चा धडकला

कोकणात आंदोलक संतप्त : 'आम्हाला हलक्यात घेऊ नका' ; आंदोलकांचा इशारा

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘अरे या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय’, अशा गगनभेदी घोषणा देत सकल मराठा समाज मराठा आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी वेळेत न आल्यामुळे आंदोलक संतप्त झाले. त्यांनी प्रवेशद्वारावरच जिल्हाधिकार्‍यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी पूर्ण तयारी करत जादा कुमक मागवून आंदोलकांचा हा प्रयत्न हाणून पाडला.


मराठा आरक्षण हे हक्काचे असून ते मिळविण्यासाठी सकल मराठा समाज राज्यात पुन्हा एकवटला आहे. राज्यात मोठा लढा उभारण्याचा निर्धार समाजाने केला आहे. त्या अनुषंगाने आज रत्नागिरी तालुक्यातील सकल मराठा समाज एकत्र आला आणि मराठा आरक्षण मिळावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मराठी क्रांती मोर्चाचे पदाधिकार्‍यांनी दिनेश सावंत, सुधाकर सावंत, अ‍ॅड. अजय भोसले, बाळ माने, संतोष तावडे, केशवराव इंदुलकर, कौस्तुभ सावंत, नंदू चव्हाण आदीनी आंदोलनाचे नेतृत्व केले. काही क्षणात शेकडो आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गोळा झाले. भगवा झेंडा आणि मराठा क्रांती मोर्चाचे फलक घेऊन आरक्षणासाठी एल्गार पुकारला.

हेही वाचा- कोरोनानंतर आता या आजाराने कोकणात घातलाय धुमाकुळ ; १८ जणांचा बळी -


मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज आणि समाजाच्या विविध संघटनांच्यावतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांची वेळ घेतली होती; मात्र जिल्हाधिकार्‍यांना यायला उशीर झाला. त्यामुळे पोलिस आणि आंदोलकांमध्ये यावरून चर्चा झाली. जिल्हाधिकार्‍यांना प्रवेशद्वारावरच अडवण्याचा पवित्रा काही आंदोलकांनी घेतला. सर्वच आंदोलक आक्रमक झाल्याने वातावरण काहीसे तापले. त्यामुळे पोलिसांनी जादा पोलिस कुमक मागवली.

जिल्हाधिकार्‍यांची गाडी आल्यानंतर गोंधळ सुरू झाला; मात्र पोलिसांनी आंदोलकांच्याभोवती कडे करून पुढच्या प्रवेशद्वाराने जिल्हाधिकार्‍यांची गाडी सोडली. पुन्हा जोरदार घोषणाबाजी करत काही पदाधिकार्‍यांनी संयम बाळगण्यास सांगितले. त्यानंतर ठराविक लोकांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकार्‍यांना भेटून मराठा आरक्षण मिळण्यासंदर्भात निवेदन दिले.

हेही वाचा- कोकणात प्रवाशांच्या प्रतिसादात एसटी पूर्ण क्षमतेने लागली धावू
 

आम्हाला हलक्यात घेऊ नका

मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांना तिष्ठत ठेवल्याने काही तरुण आक्रमक झाले होते. आम्ही शांततेच्या मार्गाने आणि संयमाने आंदोलन करून पोलिस यंत्रणेला सहकार्य करतोय. मात्र जिल्हा प्रशासनाला त्याचे काहीच नाही. प्रशासनाने आम्हाला एवढ्या हलक्यात घेऊ नये. शांत आहे तोवर आहे, असा इशारा आंदोलकांनी दिला.

संपादन - अर्चना बनगे