लोटेत वायुगळती; तिघांना बाधा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

* ओलियम वायूची बाधा 
* चार तास लोकांना इतरत्र हलवले 
* बालवाडीतील 30 विद्यार्थ्यांनाही हलवले 
* पोलिसांनी जमावाला पांगवले 

लोटे (रत्नागिरी) - लोटे औद्योगिक वसाहतीतील योजना कंपनीतून आज सकाळी साडेअकरा वाजता ओलियम वायूची गळती झाली. यामुळे दोन कामगार भाजून जखमी झाले. कंपनीपासून दोनशे फुटावर राहणारी एक वृद्धा बेशुद्ध झाली. कंपनीजवळच्या दोन वाड्यांमधील शंभर घरांतील रहिवाशांना हलवण्यात आले. 

जखमी झालेल्या दोघांना सांगली येथे उपचारांसाठी नेण्यात आले, अशी माहिती कंपनीच्या मालकांनी दिली. जखमी झालेल्यांमध्ये विनोद गणपत मोरे (वय 27) व किशोर केशव रेवाळे (36, दोघे रा. चिपळूण) यांचा समावेश आहे. वायुगळतीने सुनंदा यशवंत चाळके (70) बेशुद्ध पडल्या. येथील परशुराम रुग्णालयात प्राथमिक उपचार करून दोघांना सांगली येथे आदित्य रुग्णालयात हलविण्यात आले. वृद्धेला साईकृपा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार लोटे औद्योगिक वसाहतीत अजय मेहता यांच्या मालकीची योजना इंटरमिजियट कंपनी आहे. कंपनी रासायनिक पावडरचे उत्पादन करते. कंपनीत रंग काढण्याचे काम सुरू होते. काम सुरू असतान रंग काढणाऱ्या एका कामगाराचा पाय वायू वाहून नेणाऱ्या पाइपवर पडल्याने पाइप फुटला आणि त्यातून ओलियम हा घातक वायू बाहेर पडला. काही क्षणातच वायू हवेत मिसळला. कारखान्यात काम करणाऱ्या दोघांना व वृद्धेला त्याची लागण झाली. 

हवेत पसरलेल्या वायूचा त्रास योजना कंपनीपासून सुमारे 200 मीटरवर असलेल्या तळेरेवाडी आणि चाळकेवाडी येथील ग्रामस्थांनाही होऊ लागला. खबरदारीचा उपाय म्हणून या दोन्ही वाडीतील सुमारे 100 घरे तत्काळ खाली करून ग्रामस्थांना दूरवर सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. बालवाडीत शिकणाऱ्या 30 विद्यार्थ्यांनाही सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. वायुगळती रोखण्यासाठी आवश्‍यक असलेली यंत्रणा औद्योगिक वसाहतीत उपलब्ध नव्हती. वायुगळती रोखायची कशी, असा प्रश्‍न त्यामुळे निर्माण झाला. लोटे औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाचे नवनाथ पाखरे, त्यांचे आठ सहकारी आणि एक्‍सेल इंडस्ट्रीजच्या फायर सेफ्टी यंत्रणेच्या जवानांनी वायुगळती रोखण्यात यश मिळविले. 

वायुगळतीची खबर मिळताच खेडचे पोलिस निरीक्षक अनिल गंभीर, लोटे पोलिस दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक काकडे, हेडकॉन्स्टेबल विवेक साळवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर कंपनीबाहेर मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला होता. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कंपनीबाहेर जमलेल्या जमावाला बाजूला नेले. 

Web Title: air leakage in Lote