सिंधुदुर्गातील दोघांचे नमुने तपासणीसाठी रवाना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

यापुढेही आणखी काही दिवस येथील जनतेच्या सहकार्याने विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले.

सिंधुदुर्गनगरी - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेवून चांगले काम केल्यानेच कोरोना बाधीत एकही रूग्ण नाही. खबरदारीचा उपाय म्हणून दोघांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत; मात्र तेही रूग्ण कोरोनाबाधीत असण्याची शक्‍यता नाही, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यापुढेही आणखी काही दिवस येथील जनतेच्या सहकार्याने विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले.

श्री. सामंत यांनी आढावा बैठक घेऊन उपाय योजनांची माहिती घेतली. जिल्हा रूग्णालयाला भेट देत खबरदारीबाबत माहिती घेतली. कोकण विभागीय आयुक्‍त शिवाजीराव दौंड, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधिक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे आदींसह विविध अधिकारी उपस्थित होते. 

श्री. सामंत म्हणाले, ""कोरोना' राष्ट्रीय संकट आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी राज्यशासन आणि प्रशासन सज्ज आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाने चांगले काम करत कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. त्यामुळेच सद्यस्थितीत जिल्ह्यात एकही कोरोनाबाधीत रूग्ण नाही. ही समाधनाची बाब आहे. जिल्ह्यातील यंत्रणेने सिंधुदुर्गात दाखल होणाऱ्या सर्व देशी-विदेशी पर्यटकांची तपासणी सुरू केली आहे.

तपासणी दरम्यान आढळलेल्या 39 जणांना घरातच थांबण्याचा सल्ला दिला आहे. दोघांचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. संशयितांच्या हातावर शिक्‍के मारले आहेत. अशा व्यक्‍तींना प्रशासनाने विशेष देखरेखीखाली ठेवले; मात्र अशा व्यक्‍ती बाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.''  ते म्हणाले, ""सावंतवाडी, कणकवली, कुडाळ, मालवण येथे विशेष कक्ष स्थापन केले आहेत. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या तसेच विदेशी पर्यटकांकडून कोरोना फैलावण्याची भिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सतर्क राहिले पाहिजे.

जिल्ह्यात एकही रूग्ण नाही. यापुढेही अशीच स्थिती कायम रहावी. जिल्हा कोरोनाबाधीत होवू नये, यासाठी आवश्‍यक ती खबरदारी घ्या. आवश्‍यक सर्व निर्णय घेणे व निधी खर्च करण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. निधीअभावी कोणत्याही उपाययोजना थांबणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल.'' कोरोना राष्ट्रीय आपत्ती आहे. त्यामुळे सूचनांचे उल्लंघन किंवा कामात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई होईल. आपत्ती निवारणार्थ कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. नागरिकांनी प्रशासनाकडून दिलेला आदेश व सूचनांचे काटेकोर पालन करावे व आपत्ती रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन श्री. सामंत यांनी केले. 

नागरीकांनी सतर्क राहावे! 
प्रत्येक नागरिकांनी सतर्क राहून आपल्या गावामध्ये जिल्ह्याबाहेरून कोण व्यक्‍ती आली आहे का, आली असेल तर त्या व्यक्‍तीने आरोग्य तपासणी करून घेतली आहे का, याची माहिती करून घ्यावी. संशयित व्यक्‍ती आढळल्यास तत्काळ आरोग्य यंत्रणेला माहिती द्यावी. त्यासाठी जिल्ह्यातील नागरीकांनी सतर्क रहा, असे आवाहन श्री. सामंत यांनी केले. 

फौजदारी गुन्हे दाखल करणार 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 39 जणांना विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आले आहेत. त्यांच्या हातावर आरोग्य यंत्रणेने शिक्‍के मारले आहेत. अशा व्यक्‍तींनी बाहेर गर्दीच्या ठिकाणी फिरू नये. त्यांनी पुढील काही दिवस आरोग्य यंत्रणेच्या निगराणीखाली रहावे. तसे न करता जनतेमध्ये फिरताना आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, तसे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alert in sindhudurg